कलाकार, समाज एकत्र आल्यास पुणे देशाचीही सांस्कृतिक राजधानी होईल : गो. बं. देगलूरकरकोहिनूर कट्टा, मसाप आयोजित ‘मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे’ कार्यक्रमाचे उद्‌घाटन

कलाकार, समाज एकत्र आल्यास पुणे देशाचीही सांस्कृतिक राजधानी होईल : गो. बं. देगलूरकर
कोहिनूर कट्टा, मसाप आयोजित ‘मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे’ कार्यक्रमाचे उद्‌घाटन
 
पुणे : पुण्याचे सांस्कृतिक वैभव नष्ट होत असताना पुणेकरांनी जागृत होणे आवश्यक आहे. त्यासाठी कलाकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही गोष्ट थोडी अवघड असली तरी अशक्य नाही. समाजजागृती करून युवकांमध्ये कलांची आवड निर्माण झाल्यास सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य घडेल आणि पुणे महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी बनू शकेल. असे झाल्यास सांस्कृतिक पटलावर पुणे उभारून येईल. या करिता कलाकारांसह समाजानेही एकत्र येऊन शासनावर दबाव आणल्यास भारताचे सांस्कृतिक धन जपले जाईल आणि वृद्धिंगतही होईल, असा विश्वास मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केला.

कोहिनूर कट्टा प्रस्तुत व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे’ या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आज (दि. ६) महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक गो. बं. देगलूरकर अध्यक्षपदावरून बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर, अभिनेते प्रवीण तरडे, वीरेंद्र चित्राव मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस ‘मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे’ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

नृत्य, नाट्य, गायन, साहित्य अशा सर्व कलांसह अनेक शास्त्रांचा उद्‌भव मूलत: भारतात झालेला असून कालप्रवहात यांविषयी अयोग्य इतिहास समाजापुढे आणला गेला असे नमूद करून गो. बं. देगलूरकर पुढे म्हणाले, अनेक कला-शास्त्र पाश्चात्य देशातून भारतात आल्या हा समज अत्यंत चुकीचा आहे. परकीय आक्रमणांच्या काळात मूलत: भारतीय असलेल्या कला आणि शास्त्र चोरल्या गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेल्या आणि इतर देशातून त्या भारतात आल्या असे बिंबविले गेले. ते पुढे म्हणाले, सर्व कला आणि शास्त्र कलाकारांचा अहंकार सोडून देवतेसाठी निर्मित होत होत्या. मंदिरात या परंपरा टिकल्या आणि वाढत जात प्रगत आणि अद्ययावत होत गेल्या. कलेला उत्तेजन मिळण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास संस्कृतीचे खरे रक्षण होईल.

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे या करिता ज्या प्रमाणे शहरात पायाभूत सुविध उभारल्या जातात त्याच प्रमाणे नागरिकांचे जीवन आनंदायी व्हावे या करिता सांस्कृतिक वातावरण निर्माण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे या करिता राजकीय शक्ती आवश्यक आहे. पुण्यामध्ये उत्तमोत्तम कलाकारांसह जाणकार रसिक, श्रोते असून त्यांचा गुणवत्तापूर्वक प्रतिसाद ही पुण्याची सांस्कृतिक श्रीमंती आहे. पुणे भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या करिता सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्याकरितासाठी शासन कटिबद्ध असून योग्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन नागपुरे यांनी दिले. त्या पुढे म्हणाल्या देशाची सांस्कृतिक राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात असून या करिता योग्य तो अहवाल तयार व्हावा, ज्या योगे सर्वंकष सांस्कृतिक धोरण तयार करणे शक्य होईल. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल. यंत्रणा उभी करण्यासाठी कलाकारांचे सहाकार्य, मार्गदर्शन आवश्यक आहे. क्षमता असली तरी त्या विषयातील तज्ज्ञ नसल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या कलाकारांनी पाठपुरावा करून राजकारण्यांकडून अपेक्षित कार्य करवून घ्यावे.

योगेश सोमण म्हणाले, पुण्याला देशाची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठी कालमर्यादा अपेक्षित असून या करिता आपण काय करू शकतो याची फक्त आश्वासने नकोत तर ठोस कृती आवश्यक आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून बालविभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या करिता विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात विचारांचे आदानप्रदान होणे आवश्यक असून संस्कृती समृद्ध झाल्यास पुणे शहर सांस्कृतिक राजधानी होईल.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याचे मोठे योगदान आहे, त्यामुळे पुणे भारतीची सांस्कृतिक राजधानी व्हावी या करिता प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात या कार्यक्रमातून होत आहे. धोरण निश्चित करत सुयोग्य विचारांचे मंथन होऊन कृतीत रुपांतर झाल्यास हे कार्य सहजतेने घडेल. या करिता एक पुणेकर म्हणून सदैव सहाकार्य राहिल. 

उपक्रमाविषयी माहिती देताना वीरेंद्र चित्राव म्हणाले, पुण्याचे सांस्कृतिक मानचित्र तयार करण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेतील सहभागी मान्यवरांच्या विचारांवर आधारित मसूदा संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात करण्यात येणार असून त्याची योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुणे ही ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ आहे. खरे तर हा किताब कुठल्याही शासनकर्त्याने दिला नसून पुणेकरांनी तो आपल्या पिढीजात रसिकतेतून मिळविला आहे. चांगली हवा, मुबलक पाणी आणि पेन्शनरांचे शहर असलेले ऐतिहासिक पुणे हे स्मार्ट-मेट्रो शहर झाले आहे. या सर्वांमुळे ‘भारताची सांस्कृतिक राजधानी’ होण्याची उत्तम संधी पुण्यनगरीसाठी चालून आली आहे.

संजीव अभ्यंकर म्हणाले, कलेसाठी उपयुक्त नाट्यगृहे राजकीय कार्यक्रमांसाठी नियमितपणे वापरली जातात, ज्यामुळे अनेक उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात, हे सांस्कृतिक क्षेत्रासाठी अतिशय खेदजनक आहे. नाट्यगृहांची अवस्था उत्तम असावी, राजकीय कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नाट्यगृह असावे, नृत्य, नाट्य, कला यांच्या सरावासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्यल्प दरात जागांची उपलब्धता व्हावी, पायाभूत सुविधा उत्तम असाव्यात, प्रवास व्यवस्था उत्तम असावी, असे बदल घडल्यास सांस्कृतिक राजधानी निर्माण होण्यात पुण्याला कोणीही थांबवू शकणार नाही.

तर सांस्कृतिक केंद्रे राजकीय पक्षांचे गाळे होतील : प्रवीण तरडे
प्रवीण तरडे म्हणाले, पुणेकर आपली उद्‌धट, उर्मट अशी असलेली ओळख विसरत चालले आहेत. त्यामुळे पुण्याला भारताची सांस्कृतिक राजधानी करावी यासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम घेणे आवश्यक ठरत आहेत. पुण्याला सांस्कृतिक राजधानी बनवत असताना येथे किती रंगमंदिरे, नाट्यगृहे आहेत, त्यांची नावे काय आहेत याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे. राजकारण्यांची नावे सांस्कृतिक क्षेत्रात पुढे येऊ न देण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद पसरविणे आवश्यक आहे. उद्‌धट, उर्मट पुणेकर सौम्य झाले असल्यामुळे राजकारण्यांचा सांस्कृतिक क्षेत्रात सर्व प्रकारे झालेला शिरकाव कशासाठी या विषयी प्रश्न विचारले जात नाहीत. सांस्कृतिक व क्रीडा विभागासाठी शहराच्या अनेक भागात जागा उपलब्ध असून देखील तेथे काय घडते आहे याविषयी आवाज उठविला जात नाही. सांस्कृतिक दहशतवाद कमी झाल्यास सांस्कृतिक केंद्रे राजकीय पक्षांचे गाळे होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

सुरुवातीस मसापच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

उद्‌घाटन सत्रानंतर विविध विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘नाटक’ या विषयावर किरण यज्ञोपवित ('नाटक काल आज उद्या'), श्रीरंग गोडबोले ('दृक्-श्राव्य नवप्रवाह), विनिता पिंपळखरे ('पथनाट्य'), प्रदीप वैद्य ('नाट्य चळवळ व तंत्र’), शुभांगी दामले (‘प्रायोगिक रंगभूमी’), ‘संयोजन व इतर’ या विषयावर डॉ. सतीश देसाई ('कार्यक्रम संयोजन'), सुनील महाजन ('नाट्यगृहांचे प्रश्न'), सुनंदन लेले (‘रसिक पुणेकर’), प्रकाश भोंडे ('संगीत कार्यक्रम'), डॉ. किशोर सरपोतदार (‘कल्पक उपक्रम’), अखिलेश जोशी (‘आदरातिथ्य’), समीर हंपी (’नाटक व्यवस्थापन’), ‘संगीत’ या विषयावर मुकुंद संगोराम ('संगीत क्षेत्र'), डॉ. सलील कुलकर्णी ('सुगम संगीत'), डॉ. चैतन्य कुंटे (‘अभिजात संगीत’), अमोल निसाळ ('गुरुकुल संगीत') यांनी मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश