बोथट, दिशाहीन समजाला कवीने भावनिकदृष्ट्या सक्षम करावे : भारत सासणेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुजित कदम यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव
बोथट, दिशाहीन समजाला कवीने भावनिकदृष्ट्या सक्षम करावे : भारत सासणे
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुजित कदम यांचा काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव
पुणे : आज भोवतालचा समाज संवेदनाहीन, बोथट झालेला असून समाजात नवतुच्छतावाद निर्माण होत आहे. आंधळ्यांची यात्रा असणाऱ्या दिशाहीन समाजाला संवेदनशील, सजग करणे, रसिकातील रसिकत्व जपून ठेवत समाज भावनिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य कवींकडून होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली. कवीकडे धीर धरण्याची वृत्ती हवी, ज्यातून कवीच्या मनातील मानकाचा प्रकाश समाजावर पसरत जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कवी सुजित कदम यांचा रविवारी (दि. ३) काव्य प्रतिभा पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न संपणाऱ्या प्रवासाचा यात्री म्हणजे कवी..
कालप्रवाह थांबविण्याची ताकद कवीकडे असते, असे आवर्जून नमूद करून भारत सासणे म्हणाले, न संपणाऱ्या प्रवासाचा यात्री म्हणजे कवी होय. कवीने काव्यात्मक दृष्टी प्राप्त होण्यासाठी तांत्रिकतेत न अडकता व्यासंग वाढवत, विचारांची खोली गाठणे आवश्यक आहे. गाफिल, बेसावध असताना अस्वस्थतेच्या एका क्षणात काव्य मन:प्रकाशात अवतरित होते. त्यामुळे कवीने अविरतपणे काव्याचा शोध घेत राहणे आवश्यक आहे. सुजित कदम यांच्या काव्य लिखाणाचाही त्यांनी गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना सुजित कदम म्हणाले, ध्येयवेड्या माणसांची स्वप्ने पूर्ण होतात पण त्यासाठी मनात ध्येय असणे आवश्यक आहे. माझा कवितेचा प्रवास कधीच सहजसोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात अनेकदा पडणे-झडणे झाले. परंतु रसिकांना उत्तम देण्याचा निर्धार असल्याने जिद्द ठेवून सातत्याने प्रयत्नशील राहिलो. माझ्या कवितेला पंख लावण्याच्या कार्यात रंगत-संगत प्रतिष्ठानचा मोठा वाटा आहे. ‘मोरपीस’ आणि ‘मोबाईल’ या आशयघन कवितांचे वाचन त्यांनी केले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याची आणि पुरस्काराविषयी माहिती विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
Comments
Post a Comment