अस्थमा उपचार: दमा नियंत्रणासाठी डॉक्टरांचे आवाहन फक्तरिलीव्हर इनहेलरवर अवलंबून राहू नका, लवकर नियंत्रण महत्त्वाचे- दम्याच्या केवळ लक्षणांवर नव्हे तर श्वसनमार्गातील (एयरवे) वर येणाऱ्या
अस्थमा उपचार: दमा नियंत्रणासाठी डॉक्टरांचे आवाहन फक्त
रिलीव्हर इनहेलरवर अवलंबून राहू नका, लवकर नियंत्रण महत्त्वाचे
- दम्याच्या केवळ लक्षणांवर नव्हे तर श्वसनमार्गातील (एयरवे) वर येणाऱ्या
(सुजेचे) इन्फ्लमेशनं उपचार महत्वाचे
पुणे, मे १४, २०२६: भारतात दम्याचे व्यवस्थापन अजूनही प्रामुख्याने फक्त लक्षणांपासून आराम
मिळवण्यावरच केंद्रित आहे, ज्यामुळे आजारावर योग्य प्रकारे नियंत्रण राहत नाही आणि स्थिती अधिक गंभीर
होऊ शकते. रुग्णांना चांगले आणि दूरगामी परिणाम मिळावे, यासाठी दम्यावर सुरुवातीच्या काळात नियंत्रण
मिळवणे आणि फक्त तात्पुरत्या उपायांऐवजी योग्य दीर्घकालीन व्यवस्थापनाकडे वळणे अत्यंत गरजेचे
असल्याचे डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.
दमा हा अनेकदा फक्त अधूनमधून येणारा आजार म्हणून पाहिला जातो. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खोकला
यांसारखी लक्षणे दिसताच रुग्ण त्वरित रिलीव्हर इनहेलर्सचा आधार घेतात. पण, दमा हा श्वसनमार्गातील
सुजेमुळे (इन्फ्लेमेशन) होणारा दीर्घकालीन आजार आहे.
"दम्यावर सुरुवातीच्या काळात नियंत्रण मिळवले नाही, तर श्वसनमार्गातील ही सूज लक्षणे नसतानाही
आतल्या आत वाढत राहू शकते. यामुळे वारंवार त्रास होणे, अचानक तीव्र अटॅक येणे आणि आपत्कालीन
स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याची जोखीम वाढते. कालांतराने, अनियंत्रित दम्यामुळे
श्वसनमार्गाच्या रचनेत कायमस्वरूपी बदल होऊ शकतात, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते
आणि आजाराचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण होते," असे डॉ. राहुल केंद्रे, पुणे येथील डी. वाय. पाटील
हॉस्पिटलमधील फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ (Lung Transplant Specialist) आणि सह्याद्रि
हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट पल्मोनोलॉजिस्ट म्हणाले.
ही सूज दूर करण्यासाठी इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्स (आयसीएस) उपचारांचा सल्ला दिला जातो. फक्त
रिलीव्हर इनहेलर्सवर, विशेषतः शॉर्ट-अॅक्टिंग बीटा-अॅगोनिस्ट (एसएबीए) वर अवलंबून राहण्याऐवजी
कंट्रोलर इनहेलर्स किंवा अँटी-इन्फ्लेमेटरी इनहेलर्सचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. एसएबीए इनहेलर्स
फक्त श्वसनमार्गाच्या स्नायूंना शिथिल करून तात्पुरता आराम देतात, तर कंट्रोलर इनहेलर्स मूळ सूज कमी करून
दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यास मदत करतात.
भारतामध्ये सुमारे ३५ दशलक्ष लोक दमा या आजाराने पीडित आहेत. लंग इंडिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या
एका संशोधन अहवालानुसार, ९० टक्के रुग्ण ज्यांना आयसीएस उपचारांची गरज आहे, त्यांना ते मिळत
नाहीत किंवा ते त्याचा वापर करत नाहीत. या आकडेवारीमधून दम्याच्या व्यवस्थापनातील मोठी तफावत
आणि कंट्रोलर इनहेलर आधारित उपचारांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज दिसून येते.
"रिलीव्हर इनहेलर्स तात्पुरता आराम देतात, पण ते सूज बरी करत नाहीत. तसेच, इन्हेल्ड
कॉर्टिकोस्टिरॉईड्सबद्दलची भीती निराधार आहे, कारण अनियंत्रित दम्यासाठी ओरल (तोंड वाटे घेण्याची)
स्टिरॉईड्स घ्यावी लागतात, तेव्हा त्यांचा डोस इनहेलरच्या तुलनेत जवळपास १००० पटीने जास्त असतो.
रुग्णाला वारंवार रिलीव्हर इनहेलर वापरावे लागत असेल, तर त्याचा अर्थ दमा नियंत्रणाबाहेर आहे असा
होतो. आता आपले लक्ष कंट्रोलर इनहेलर्सच्या मदतीने दम्याचे दीर्घकालीन व्यवस्थापन करणे, डॉक्टरांनी
दिलेल्या उपचारांचे काटेकोर पालन करणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे याकडे वळवणे आवश्यक
आहे," असे डॉ. वृषाली खरीद खडके पुणे येथील श्वास क्लिनिकमधील आणि पुना हॉस्पिटल मधील कंसल्टंट
पलमोनोलॉजिस्ट म्हणाल्या.
ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (जीआयएनए, २०२६) च्या नवीन शिफारसींमध्येही दम्याच्या चांगल्या
नियंत्रणासाठी फक्त रिलीव्हर (एसएबीए) उपचारांऐवजी इन्हेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड (आयसीएस) आधारित
उपचारांकडे वळण्यावर भर देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment