पुण्यात विषारी ताडी/दारू प्राशनाने १८ जणांचा मृत्यू; दिप्ती चवधरी यांच्याकडून तीव्र संताप आणि सखोल चौकशीची मागणी
*पुण्यात विषारी ताडी/दारू प्राशनाने १८ जणांचा मृत्यू; दिप्ती चवधरी यांच्याकडून तीव्र संताप आणि सखोल चौकशीची मागणी*
पुणे :
पुणे आणि परिसरात मिथिल अल्कोहोलयुक्त (Methyl Alcohol) विषारी दारू/ताडी प्राशनाने तब्बल १८ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच दिप्ती चवधरी यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बेकायदेशीर आणि मानवी जिवाशी खेळणाऱ्या अशा रासायनिक मिश्रित अमली पदार्थांची विक्री शहरात सर्रास सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) आणि स्थानिक पोलीस प्रशासन काय करत होते? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात बोलताना दिप्ती चवधरी म्हणाल्या की, "हा केवळ अपघाती मृत्यू नसून, पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप गरिबांच्या जीवाशी खेळलेला क्रूर खेळ आहे. एकाच वेळी १८ संसार उद्ध्वस्त होणे ही पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळेच राज्याचे गृहखाते सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदे सांभाळण्यास असमर्थ ठरले आहेत. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत असे जीवघेणे व्यवसाय फोफावत असतील, तर त्याला सर्वस्वी यंत्रणेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करते की, या प्रकरणाची तातडीने विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी व्हावी आणि मुख्य सूत्रधारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी."
दिप्ती चवधरी यांनी मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र सहसंवेदना व्यक्त केल्या असून, बाधित कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पुण्यात अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment