शारदा चषक पहिली जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धाईशान खांडेकर, रुचिता दारवटकर व शरण्या पटवर्धन यांना दुहेरी मुकुटस्वयम कोठावळे याचीही विजेतेपदावर मोहोर

शारदा चषक पहिली जिल्हा मानांकन 
टेबल टेनिस स्पर्धा
ईशान खांडेकर, रुचिता दारवटकर व शरण्या पटवर्धन यांना दुहेरी मुकुट
स्वयम कोठावळे याचीही विजेतेपदावर मोहोर

पुणे दिनांक ३१ मे २०२६
 शारदा चषक पहिल्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ईशान खांडेकर, रुचिता दारवटकर व शरण्या यांनी प्रत्येकी दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि दुहेरी मुकुट मिळविला. द्वितीय मानांकित स्वयम कोठावळे यानेही विजेतेपदावर मोहोर उमटवली.

शारदा स्पोर्ट्स सेंटर (नळ स्टॉप जवळ) येथे शारदा स्पोर्ट्स सेंटरतर्फे व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा शारदा समूह आणि डेक्कन डाईज अँड केमिकल्स यांनी पुरस्कृत केली होती.

ईशान या द्वितीय मानांकित खेळाडूने पुरुषांच्या अंतिम लढतीत प्रणव घोलकर या चौथ्या मानांकित खेळाडूचा अटीतटीच्या झुंजीनंतर पराभव केला. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना त्याने ७-११,११-७,११-८,८-११, १२-१०,११-८ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. ईशान याने या आधी १९ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले होते.

महिलांच्या अंतिम लढतीत रुचिता हिने सहाव्या मानांकित समृद्धी कुलकर्णी हिला चुरशीच्या लढतीत ११-९,९-११, ९-११,११-२,११-५,११-९ असे पराभूत केले. हा सामनाही शेवटपर्यंत रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत प्रेक्षकांना खेळाचा निखळ आनंद मिळवून दिला. रुचिता ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत आहे. तिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटातही विजेतेपद पटकावले होते. 

मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात शरण्या हिने अंतिम सामन्यात शगुन गणेशे हिचा ८-११,११-७,११-५,१४-१२ असा पराभव केला. शरण्या ही बाल शिक्षण प्रशालेत पाचव्या इयत्तेत शिकत असून तिला मार्तंड बिनीवाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या आधी तिने तेरा वर्षाखालील गटात विजेतेपद पटकाविले होते. 

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात स्वयम याने अंतिम सामन्यात अग्रमानांकित नक्ष महाजन याच्यावर १२-१०, ६-११,११-९,७-११,११-६ असा रोमहर्षक विजय नोंदविला. स्वयम हा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अजेय सिधये यांचा नातू व माजी राष्ट्रीय खेळाडू नेहा सिधये- कोठावळे यांचा मुलगा आहे. तो अभिनव इंग्रजी प्रशालेत पाचव्या इयत्तेत शिकत आहे.

शरण्या पटवर्धन व ईशान खांडेकर यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते झाला यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष स्मिता बोडस व डॉक्टर उदय भालचंद्र, जिल्हा मानांकन समितीचे अध्यक्ष डॉक्टर मोहन उचगावकर, तसेच संघटक श्रीकांत अंतुरकर अविनाश जोशी, सुरेंद्र देशपांडे, आशिष बोडस, अरविंद नातू आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश