वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित श्री भागवत सप्ताहाचा समारोप
वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित श्री भागवत सप्ताहाचा समारोप
पुणे : वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेतर्फे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री भागवत सप्ताहाचा आज (दि. ३०) समारोप झाला. युवा पिढीतील अभ्यासू प्रवचनकार वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांनी ओघवत्या भाषेतील निरूपणाद्वारे भागवत पुराणाविषयी विवेचन केले.
वेदशास्त्रोत्तेजक सभा सभागृह, सारसबागेजवळ येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत पुराणावर प्रवचन करताना वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांनी शास्त्रग्रंथातील सिद्धांत सांगून ते श्रोत्याने सहजतेने समजण्यासाठी सोपे-सोपे दृष्टांत दिले. त्याच प्रमाणे ज्ञानेश्र्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आदि संतवाङ्मयातील ओव्या देखील उधृत केल्या. भागवत पुराणातील परिचित कथांमागील तात्विक विचार, आध्यात्मिक चिंतन त्यांनी सहजसोपे दाखले देऊन श्रोत्यांपर्यंत पोहोचविले.
सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरुषोत्तम यागात ऋग्वेदातील पवमानसूक्ताने हवन करण्यात आले. त्यानंतर पूर्णाहुती व वसोर्धारा होमाने यागाचे अनुष्ठान पूर्णत्वास नेण्यात आले.
सभेचे माजी पदवीधर स्मार्तचूडामणी वेदमूर्ती दत्तात्रय जोशी आणि सहकारी पुरोहितांनी या यागाचे अनुष्ठान पूर्णत्वास नेले.
वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेतर्फे वेदमूर्ती सुदर्शन जोशी-बेलगावकर यांचा चंद्रशेखर बापट, श्रद्धा परांजपे, विनया देव, भगवंत ठिपसे, श्रीकांत फडके यांनी पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सन्मान केला.
Comments
Post a Comment