मराठी समाजाचे वैचारिक भरणपोषण दिवाळी अंकांमुळे ! - अभिराम भडकमकर
मराठी समाजाचे वैचारिक भरणपोषण दिवाळी अंकांमुळे ! - अभिराम भडकमकर
पुणे : आपल्या मराठी समाजातील वैचारिक परिपक्वतेचे भरण पोषण दिवाळी अंकांनी केले. यासाठी संपादकांनी केलेले काम मोठे आहे. पण आता मोजकेच दिवाळी अंक वैचारिकतेला प्राधान्य देतात हे प्रमाण वाढले पाहिजे असे विचार प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भडकमकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. दिवाळी अंक फक्त उपक्रम न रहाता वाचक चळवळ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मसाप तर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार अभिषेक जाखडे आणि संतोष शेणई संपादित पद्मगंधा दिवाळी अंकाला देण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना मसाप चे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी सांगितले की, दिवाळी अंकांच्या सर्व संपादक व प्रकाशकांचे चर्चासत्र घेऊन दिवाळी अंकांसमोरील सर्व समस्यांचा विचार केला पाहिजे. यासाठी मसाप पुढाकार घेईल.
अन्य पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकुमारांसाठी असणा-या दिवाळी अंकाचे पारितोषिक वर्षा तोडमल संपादित मनशक्ती बालकुमार दिवाळी अंकाला देण्यात आला. एकाच विषयावर काढलेल्या विशेषांकांचे पारितोषिक लग्न या विषयावर नामदेव कोळी यांनी संपादित केलेल्या वाघूर या दिवाळी अंकाला देण्यात आला. तसेच अन्य दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून सांगलीतून प्रकाशित होणा-या चौफेर समाचार ला पारितोषिक देण्यात आले. हा अंक अमोल मद्वाण्णा आणि अरूण नाईक यांनी संपादित केला आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह डाॅ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविक केले.
Comments
Post a Comment