केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नवव्या डॉ.बानू कोयाजी स्मृती व्याख्यानाचे आयोजन· हवामान बदलांना प्रतिसाद देणारी व लोककेंद्रित आरोग्ययंत्रणेची गरज· समुदाय, हवामान आणि आरोग्यसेवा विषयावर डॉ.सौम्या स्वामीनाथन यांचे व्याख्यान
केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नवव्या डॉ.बानू कोयाजी स्मृती व्याख्यानाचे आयोजन
· हवामान बदलांना प्रतिसाद देणारी व लोककेंद्रित आरोग्ययंत्रणेची गरज
· समुदाय, हवामान आणि आरोग्यसेवा विषयावर डॉ.सौम्या स्वामीनाथन यांचे व्याख्यान
पुणे, 21 मे 2026 : हवामान बदलामुळे आरोग्यावर होणारा परिणाम वाढत असून यासाठी या बदलांना प्रतिसाद देणारी व लोककेंद्रित सार्वजनिक आरोग्ययंत्रणेची गरज असल्याचे मत एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्ष,जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माजी सरसंचालिका डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.
केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि केईएम हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने नवव्या डॉ.बानू कोयाजी स्मृती व्याख्यानाचे बोटक्लब येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी समुदाय, हवामान आणि आरोग्यसेवा : लोककेंद्रित सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांचे पुनरुज्जीवन (कम्युनिटी,क्लायमेट ॲन्ड केअर - रिव्हाईव्हिंग पीपल-सेंटर्ड पब्लिक हेल्थ सिस्टिम्स) या विषयावर सादरीकरण केले. याप्रसंगी केईएम हॉस्पिटल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.कुरूस कोयाजी,केईएम हॉस्पिटल पुणेचे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी, केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ.लैला गार्डा,केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया आणि मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, जगभरातील सर्व राष्ट्रांप्रमाणेच भारतात देखील हवामान बदलाचा परिणाम होत आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी भागात तीव्र हवामानाच्या घटना घडत आहेत. यामुळे वाढते तापमान,पाण्याची टंचाई,अन्न उत्पादनावर परिणाम आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सार्वजनिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होत आहे. विशेष करून महिला आणि लहान मुलांवर अधिक प्रमाणात परिणाम होत आहे. आर्युमानासाठी वायू प्रदूषण हा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. जवळपास 70 टक्के भारतीय सुरक्षित हवेच्या गुणवत्तेचे मानक ओलांडणाऱ्या भागात राहतात. उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यूदरही वाढत आहेत. त्याचबरोबर असंसर्गजन्य रोग,दुखापती सारख्या आरोग्य समस्या देखील वाढत आहेत. त्याचबरोबर चुकीचा आहार,तंबाखु,मद्यपान यासारख्या गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.सार्वजनिक आरोग्य कृतीच्या केंद्रस्थानी समुदाय व आरोग्य सेवा कर्मचारी असणे आवश्यक आहे.
या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हवामान बदलाला प्रतिसाद देणारी व स्थानिक परिस्थितीनुसार सतत विकसित होणाऱ्या आरोग्य प्रणालीची गरज आहे.शहरांना लवचिक,शाश्वत व पर्यावरणपूरक सुविधांची गरज असल्याचे डॉ.स्वामीनाथन यांनी सांगितले.
डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या वडिलांची बायोहॅपीनेस या संकल्पनेविषयी सांगताना म्हणाल्या की, ही संकल्पना पुढे नेऊन मोजता येण्याजोगी शाश्वत विकासाची चौकट म्हणून विकसित करण्याची वेळ आली आहे. या समग्र चौकटीमध्ये मानवी कल्याण हे जैवविविधता संवर्धनाशी खोलवर जोडल्यास मानव व निसर्गात सुसंवाद निर्माण होऊ शकतो आणि वर्तमान व भावी पिढ्यांसाठी शाश्वत आरोग्य,पोषण,उपजीविका आणि सर्वांगीण विकास होऊ शकेल.
केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ.लैला गार्डा म्हणाल्या की, डॉ.बानू कोयाजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ आहे.भारतातील सामुदायिक आरोग्य आणि ग्रामीण आरोग्यसेवेसाठी डॉ.बानू कोयाजी यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेले द बानू कोयाजी ओरेशन हे महत्त्वूपर्ण सार्वजनिक आरोग्य विषयांवरील संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून ठरत आहे.
डॉ.लैला गार्डा यांनी प्रास्ताविक केले तर,शिरीन वाडिया यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment