शाहिरी आणि कीर्तन हे समृद्ध परंपरेची दोन भक्कम अंग*राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांचे मत : लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना प्रदान ; वीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान
*शाहिरी आणि कीर्तन हे समृद्ध परंपरेची दोन भक्कम अंग*
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांचे मत : लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना प्रदान ; वीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान
पुणे : कीर्तनकारांनी देखील शाहिरीवर मनापासून प्रेम केले आहे. शाहिरी आणि कीर्तन ही आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची दोन अत्यंत भक्कम आणि प्रभावी अंग आहेत. या दोन्ही कलाप्रकारांनी समाजप्रबोधन, संस्कार आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केले.
शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे शनिवार वीर मारुती उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'लोकपरंपरा पुरस्कार' देण्याची परंपरा सुरू झाली आहे. या वर्षीचा 'लोकपरंपरा पुरस्कार' आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गोपालकृष्ण दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, अॅड.प्रवीण जोशी, शकुंतला दहाड, राम दहाड व सहकारी मंडळी उपस्थित होते.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, सन १९८२ पासून गेली ४४ वर्षे मी शाहिरी क्षेत्रामध्ये काम करत आहे. एखादे काम करणे इतके सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काम केले, तरच माणसाला किंमत मिळते हे आज मिळालेल्या पुरस्कारांमधून सिद्ध होत आहे. हा परंपरेसाठीचा पुरस्कार आहे, आणि परंपरा जपण्यासाठी माणसाने जर आयुष्य घातले, तरच त्याला कुठेतरी एक स्थान मिळते. आदर्श शिक्षक स्व श्रीरामजी दहाड यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे नावाने पुरस्कार मिळतोय याचाही सार्थ अभिमान आहे. कीर्तन आणि शाहिरी या दोन्ही परंपरा नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनीही एकच काम केले आहे. कीर्तनातून भक्ती सांगितली जाते, तर शाहिरीतून वीररसातून देशभक्ती जागवली जाते.
राम दहाड म्हणाले, शनिवार पेठेत पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी झाली. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणा-या व्यक्तींना सन २०२४ पासून 'लोकपरंपरा पुरस्कार' देण्यात येतो. आचार्य शाहीर हेमंत मावळे यांनी शाहिरी परंपरेच्या जतनासाठी अथक प्रयत्न केले आहेत. तसेच विनामूल्य पोवाडे प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. ही परंपरा अधिक जिवंत राहावी यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment