दगडूशेठ’ गणपतीला ५१ लाख सुवासिक पुष्पांचे अर्घ्य**श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ ; वासंतिक उटी, मोगरा महोत्सव
*‘दगडूशेठ’ गणपतीला ५१ लाख सुवासिक पुष्पांचे अर्घ्य*
*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ ; वासंतिक उटी, मोगरा महोत्सव*
पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.
Comments
Post a Comment