दोन विस्मृतीत गेलेल्या वीरांगनांचे स्मृतीचित्रात रूपांतर करणारे पुस्तकइतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांचे मतद एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे ‘विस्मृत वीरांगना’ पुस्तकाचे प्रकाशन



दोन विस्मृतीत गेलेल्या वीरांगनांचे स्मृतीचित्रात रूपांतर करणारे पुस्तक
इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांचे मत

द एम्पॉवर हर फाउंडेशनतर्फे ‘विस्मृत वीरांगना’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, १९ एप्रिल : "मी उच्च शिक्षण घेणारच, नवरा माझ्या पसंतीचाच असणार, हुंडा देणार नाही, कुटुंब छोटे ठेवणार, मी नोकरी किंवा व्यवसाय करणारच आणि मुलगा-मुलगी असा भेद करणार नाही. अशी प्रतिज्ञा द एम्पॉवर हर फाउंडेशनच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आलेल्या मुलींनी घ्यावी,” असा सल्ला इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांनी दिला. यातूनच स्व. सुजाताबाई भागवत यांना अभिप्रेत असणारी स्त्री घडेल.

द एम्पॉवर हर फाउंडेशन यांच्या वतीने डेक्कन जिमखाना येथे मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने गौरविलेल्या लेखिका स्व. सुजाताबाई भागवत लिखित ‘विस्मृत वीरांगना’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी ‘अनुबाई घोरपडे आणि राणी दीपाबाई भोसले आणि आजची पिढी’ या विषयावर त्यांनी भाषण केले.

या प्रसंगी द एम्पॉवर हर फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त संदीप नुलकर, फाउंडेशनच्या डायरेक्टर ऑफ मिशन तन्मयी खिरे आणि सुजाताबाईंचे नातू चंद्रकांत व जयंत कुंटे व नात नंदिता नुलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, "हे संशोधनपूर्ण लिहिलेले पुस्तक असून यात संशोधन आणि साहित्य यांची सांगड घातली गेली आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. यामध्ये पोवाड्याच्या रचना देखील असून, लेखिकेचा प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती त्यांच्या लिखाणामधून दिसून येते.”

“हे पुस्तक ज्या काळात लिहिले गेले त्यावेळी राज्यात स्त्रीवाद उफाळून आला होता. स्त्रीविषयी जाणीवा वाढत चालल्या होत्या. आजही अशा चळवळी सुरू आहेतच. म्हणजेच आजही काळ फार बदलला आहे असे नाही. नुकत्याच फेटाळल्या गेलेल्या स्त्रियांविषयक विधेयकावरून आपला समाज आजही पुरुषशाही आहे हे दिसते. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आजच्या काळात नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल.”

"लेखिकेने या पुस्तकात अज्ञात राहिलेल्या दोन स्त्रियांची कथा सांगितली आहे. अनुबाई घोरपडे या थोरले बाजीराव यांच्या बहिण होत्या. त्या अत्यंत शूर, हुशार आणि शौर्यवान होत्या. त्यांच्या कार्य व कर्तृत्वातून सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे. तसेच राणी दीपाबाई भोसले या व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी होत्या. त्यांनी दोन भावांमध्ये समेट घडवून आणण्याचे फार महत्त्वाचे काम केले होते. त्याकाळात त्यांनी पतीला हितोपदेश करण्याची भूमिका स्वीकारली. सुजाताबाईंनी अशा दोन्ही स्त्रियांचे कर्तृत्व उजेडात आणले.”

संदीप नुलकर म्हणाले, "या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासातील दोन वीरगाथा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे ज्यातून समाजातील अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळू शकेल. द एम्पॉवर हर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मुलींच्या पालकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे हे आमचे ध्येय आहे. इतिहासातील वीर स्त्रियांच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा ठेवून संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.”

या प्रसंगी नंदिता नुलकर यांच्या हस्ते दिया दिघे, पियुषा पांडव, गायत्री रावडे, सुप्रिया रौकाळे, समीक्षा म्हेत्रे, लावण्या पवार, प्रिया दिघे, श्रद्धा पाटील, श्रेया उबाळे या मुलींचा विशेष सत्कार करून त्यांना प्रकाशित झालेले पुस्तक भेटस्वरूप दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा भट-बेहेरे आणि आभार प्रदर्शन संदीप नुलकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य