पहिल्या कऱ्हाडेरत्न पुरस्काराने प्रथमेश लघाटे सन्मानितरणरागिणी झाशीची राणी साहसी शौर्य पुरस्काराने युवतींचा सन्मान


पहिल्या कऱ्हाडेरत्न पुरस्काराने प्रथमेश लघाटे सन्मानित

रणरागिणी झाशीची राणी साहसी शौर्य पुरस्काराने युवतींचा सन्मान

 

पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आयोजित वासंतिक उत्सवात पहिल्या कऱ्हाडे युवारत्न पुरस्काराने प्रथितयश युवा गायक प्रथमेश लघाटे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे युवारत्न पुरस्काराचे स्वरूप होते. रणरागिणी झाशीची राणी साहसी शौर्य पुरस्काराने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या हृदया हर्डीकर, प्रिया गुर्जर, अन्वी करंबेळकर, कुहू खांडेकर, जुहू खांडेकर आणि सानिया चांदोरकर यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभ सोमवारी कोथरूड येथील पुण्याई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल अभिमन्यू आठल्ये आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे अध्यक्ष अमित शहाणे यांच्या हस्ते झाले. कऱ्हाडे ज्ञातीतील दहावी, बारावी, शिष्यवृत्तीप्राप्त, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे पदाधिकारी मकरंद फणसळकर, विद्याधर शेवडे, सूर्यकांत सरवटे, हरी मुणगेकर, मुक्ता चांदोरकर, अनिल शेवडे, वैशाली वर्णेकर, शुभा मोघे, तेजश्री सरदेसाई, यशोधन नाटेकर, ऋषिकेश पळसुलेदेसाई, गिरीश शेवडे उपस्थित होते.

शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या उपक्रमांची माहिती नवनियुक्त अध्यक्ष अमित शहाणे सुरुवातीस यांनी दिली. पुरस्कारप्राप्त युवतींच्या वतीने सानिया चांदोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शुभा मोघे यांनी केले तर आभार मकरंद फणसळकर यांनी मानले.

प्रथमेश लघाटे यांची गायन मैफल..

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रथमेश लघाटे यांची गायन आणि संवादात्मक मैफल रंगली. सांगीतिक क्षेत्रातील वाटचाल उलगडून सांगताना प्रथमेश लघाटे यांनी राग धानीसह ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’, ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘मलयगिरीचा चंदन गंधीत’, ‘अलबेला सजन आयो रे’, ‘लागा चुनरी मे दाग’, ‘आनंद पोटात माझ्या माईना’, ‘घेई छंद मकरंद’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘इलुसा हा देही किती खोल डोह’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा’ या गीतांसह समर्थ रामदास स्वामी यांची स्वत: संगीतबद्ध केलेली ‘छत्रसुखासिनी अयोध्येचा राजा’ या रचना ऐकविल्या. कार्यक्रमाची सांगता ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने करत विठ्ठल नामाच्या गजरात उपस्थितांना सामिल करून घेत अनोखी स्वरभेट दिली. अथर्व कुलकर्णी (संवादिनी), मंदार बगाडे (तबला) यांनी साथसंगत केली तर वैशाली वर्णेकर यांनी संवाद साधला.

सैन्यदलात कर्तव्य बजावणे हे व्रत : अभिमन्यू आठल्ये..

लेफ्टनंट कर्नल अभिमन्यू आठल्ये यांचे ‘सैन्यदलातील संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले, ज्या प्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने इंग्रजांची सत्ता झुगारून समाजात मोठी क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे आजच्या काळत युवक-युवतींनी विचारांच्या पातळीवर क्रांती घडविली पाहिजे. सैन्य दलाचा वारसा आज स्त्रिया देखील पुढे नेऊ शकत आहेत. सेनेत कर्तव्य बजावणे म्हणजे, नुसती नोकरी नव्हे तर हे एक व्रत आहे. समाज सैनिकाकडे अभिमानाने पाहत असतो. सैन्य दलात बारावीनंतर विविध संधी उपलब्ध आहेत. ज्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय, कायदा आणि शिक्षण या क्षेत्रात कार्य करता येते. महिलांना देखील सैन्यदलात विशेष संधी उपलब्ध आहेत. युवा पिढीने देशसेवेने प्रेरित होऊन, स्वत:च्या क्षमता ओळखत, आवडीचा सन्मान करत, मोठी स्वप्ने बाळगत फक्त सैन्यदलातच नव्हे तर उत्तम आदर्श नागरिक बनण्यासाठी कटिबद्ध रहावे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य