ओव्हरहेड केबल्स कारवाईवर शिवसेना आक्रमक,नियमावली तयार होईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी.



ओव्हरहेड केबल्स कारवाईवर शिवसेना आक्रमक,
नियमावली तयार होईपर्यंत कारवाई स्थगित करण्याची मागणी. 

पुणे प्रतिनिधी - 
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच स्टार्टअप्स यांचे दैनंदिन कामकाज ठप्प होत असून शहराच्या डिजिटल प्रगतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे याविषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पुणे मनपा आयुक्त यांस निवेदन देऊन तत्पर स्थगिती देण्याचे आवाहन केले आहे. 

पुणे शहर हे शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रात देशात अग्रस्थानी असताना अशा प्रकारची नियोजनशून्य व एकतर्फी कारवाई शहराच्या प्रतिमेलाच धक्का देणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या Digital India उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट ही अत्यावश्यक सेवा बनली असताना त्यात अडथळे निर्माण होणे चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय मोरे (शहरप्रमुख), गजानन थरकुडे (शहरप्रमुख) आणि अनंत घरत (प्रसिद्धी प्रमुख) यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
 • ओव्हरहेड केबल्स संदर्भात स्पष्ट व पारदर्शक नियमावली तात्काळ तयार करावी
 • नियमावली लागू होईपर्यंत सध्या सुरू असलेली कारवाई स्थगित करावी
 • लहान व मध्यम इंटरनेट सेवा पुरवठादारांसाठी सुलभ परवाना प्रक्रिया राबवावी
 • कारवाईमागील हितसंबंध सार्वजनिक करावेत
 • सर्व कंपन्यांवर समान निकषांनुसार पारदर्शक कारवाई करावी

यावेळी अनंत घरत यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे, तसेच कोणतीही प्राथमिक उपाययोजना, नियमावली नसताना अश्या अतिरेकी स्वरूपाची कारवाई करणे म्हणजे प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे आणि सदर प्रकरणात कारवाई वरून पुण्याच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष जर भांडणे करत असतील आणि राजीनाम्यापर्यंत चर्चा झाली असेल तर नक्कीच या विषयात काहीतरी खजिना असल्याशिवाय सत्ताधारी रस्त्यावर उतरून प्रशासनाला वेठीस धरून कारवाई करून घेत आहेत, असेच ते ड्रेनेज, नाले साफसफाई वर भांडले असते तर पुणे तुंबले नसते.” अशी पुण्यात चर्चा आहे. 

सदर प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने समन्वय साधून ठोस आणि लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

“स्मार्ट सिटी”च्या दिशेने वाटचाल करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करूनच धोरणे आखली पाहिजेत, अन्यथा विकास प्रक्रियेलाच अडथळा निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य