मणी मल्लाचा वध करण्यासाठी शिवाने घेतलेला खंडोबाचा अवतार... तळी भरणे...जागरण गोंधळ...खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह सोहळा... मल्हारी मार्तंडाचे तेजस्वरूप...अशा भगवान महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र विविधांगी रांगोळ्या मधून साकारत जेजुरीच जणू पुण्यात अवतरली आहे.
प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-
*विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी*
'जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ; श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; विनामूल्य प्रवेश
पुणे : मणी मल्लाचा वध करण्यासाठी शिवाने घेतलेला खंडोबाचा अवतार... तळी भरणे...जागरण गोंधळ...खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह सोहळा... मल्हारी मार्तंडाचे तेजस्वरूप...अशा भगवान महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र विविधांगी रांगोळ्या मधून साकारत जेजुरीच जणू पुण्यात अवतरली आहे.
श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवावर आधारित ‘जय मल्हार’ या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातील द्वादश मार्तंड खंडोबा लिंग तसेच जेजुरी खंडोबा मंदिर येथील खंडोबा देवाच्या मानाच्या पगडीचे दर्शन देखील यानिमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे अध्यक्ष ऍड. विश्वास पानसे व विश्वस्त मंडळ, ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, अभिनेते देवदत्त नागे, कल्पेश गोसावी, सुप्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक प्रा. अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अजित पवार, दिनेश मंची उपस्थित होते. प्रदर्शनादरम्यान बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात खंडेरायाच्या पालखीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
प्रदर्शनात ‘श्री खंडोबा चरित्र’ ३० वेगवेगळ्या रांगोळ्यांमधून साकारण्यात आले आहे. प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी साधारण ४० ते ४८ तासांचा कालावधी लागला असून, एकूण सुमारे ५०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. हे प्रदर्शन ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
प्रा.अक्षय शहापूरकर म्हणाले, विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्यांचा समावेश प्रदर्शनात आहे. यात थ्रीडी रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी, हलती रांगोळी, टू-इन-वन रांगोळी आणि प्रतिबिंब रांगोळी यांचा समावेश असून, पाहणाऱ्यांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment