विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज*प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मतशिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' कार्यक्रमाचे आयोजन


*विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज*
प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत
शिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. गुगलच्या युगात नवीन पिढीतील शिक्षक कसे घडवायचे, हा मोठा प्रश्न असून शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बनणे आवश्यक आहे. स्टार्टअप संस्कृतीच्या संदर्भात देशासमोरील खरी समस्या अर्थसंकल्पीय तूट नसून विश्वासाची कमतरता आहे. हा विश्वास केवळ समाजातच नव्हे, तर कुटुंबातही निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक असून, तरुण पिढीमध्ये विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही मत प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळी च्या वतीने 'भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती' या संकल्पनेवर आधारित नेतृत्व विकास या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात करण्यात आले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बदलत्या काळात नेतृत्वाची भूमिका आणि नवोन्मेषाची गरज यावर उपस्थित यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्रही पार पडले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर आदि उपस्थित होते.

यानंतर सुधीर काळकर, गजेंद्र पवार आणि अ‍ॅड. सदानंद फडके यांनी शिक्षण, व्यवस्थापन आणि नेतृत्व विकास यामधील आव्हाने व संधी यावर मार्गदर्शन केले. डॉ. उदय साळुंखे यांचे 'घातांकीय भविष्याची निर्मिती व विकासवादी दृष्टीकोनाची भूमिका' या विषयावर व्याख्यान झाले. तसेच डॉ. प्रशांत दुराफे यांनी नवोन्मेष आणि इन्क्युबेशन क्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली. कार्यक्रमात विविध संस्थांच्या प्रमुखांनी आपले विचार मांडले. 'पुढील दिशा' या विषयावर सुधीर काळकर यांनी मार्गदर्शन केले. पराग ठाकूर यांनी समारोप केला. शिक्षण प्रसारक मंडळीच्या सचिव रमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी सक्षम करण्याची गरज आहे. शिक्षकांनी पारंपरिक शिक्षक-केंद्रित पद्धतीऐवजी विद्यार्थी-केंद्रित शिक्षण आवश्यक असून, शिक्षकांनी ‘प्रेझेंटर’ न राहता ‘फॅसिलिटेटर’ची भूमिका स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले. तसेच एकसारख्या शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिक्षणावर भर द्यावा. केवळ सुधारणा नव्हे तर क्रांतिकारी बदल घडवणारे नेतृत्व आवश्यक आहे. समस्यांमध्ये संधी शोधणे, धाडसी कल्पनांवर विश्वास ठेवणे आणि मोठी ध्येये ठेवणे ही नवोपक्रमी नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शिक्षण प्रणालीत होणाऱ्या बदलांचा वेध घेत, निष्क्रियतेकडून सक्रियतेकडे, पाठांतरातून समजून घेण्याकडे आणि अवलंबित्वातून स्वावलंबनाकडे जाण्याची गरज असल्याचेही सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण संशोधन आणि नवपक्रम यांचा परस्पर संबंध मजबूत करणे गरजेचे आहे. आजच्या काळात केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची क्षमता चिकित्सक विचार सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता यांसारखी कौशल्य विकसित करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य