गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असावा : प्रा. मिलिंद जोशीदीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने अमिता पैठणकर यांचा गौरव
गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असावा : प्रा. मिलिंद जोशी
दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने अमिता पैठणकर यांचा गौरव
पुणे : गझल लिहिताना आकृतीबंधाचा विचार होणे ज्या प्रमाणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असते. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. कसदार लेखनासाठी पुनर्लेखन अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा अधोरेखित करत लोकांतात समाजदर्शन घडते तर एकांकात आत्मदर्शन घडते, असेही सांगितले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गझलकारा अमिता पैठणकर यांचा रविवारी (दि. १९) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते. कार्यक्रम अक्षरवेल सभागृह, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला होता.
तंत्र, प्रतिभा आणि अनुभव जेव्हा एकमेकांमध्ये बेमालुमपणे मिसळले जातात तेव्हा उत्तम गझल निर्माण होते, असे सांगून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, सुरुवातीस तंत्र, नंतर स्वत:तील प्रतिभेचा शोध आणि अनुभव अशा प्रक्रियेतून आतून उमलून आल्यानंतर उत्तम गझलेची निर्मिती होते. असा प्रवास अमिता पैठणकर यांच्या गझलांमध्ये दिसून येतो. ज्या वेळेला आत्मदर्शन आणि समाजदर्शन एकरूप होते त्या वेळेला अप्रतिम गझलेची निर्मिती होते, असेही ते म्हणाले. उत्तम कलाकृतींचे सृजन व्हावे तर दुय्यम कलाकृतींचे हनन व्हावे या करिता संपादन, समीक्षण होणे गरजेचे आहे. आज साहित्य क्षेत्रात समीक्षकांची वानवा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले समीक्षेचे अध:पतन म्हणजेच साहित्य क्षेत्राचे अध:पतन होय. गझलकारांमध्ये आढळणारा मोकळेपणा कवींमध्ये दिसून येत नाही, याकडेही प्रा. जोशी यांनी लक्ष वेधले.
आडकर यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून सहकाऱ्याच्या स्मृती जपून ठेवण्याचे उदात्त कार्य केले आहे. दीपक करंदीकर साहित्याच्या सर्व प्रांतात लिलया संचार करणारे संस्थात्मक कार्य करत लेखन व सादरीकरण करणारे उत्तम व्यक्तीमत्त्व होते, असे प्रा. जोशी यांनी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना अमिता पैठणकर म्हणाल्या, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कवितेने मला साथ दिली तर गझलेने जगण्याचे भान दिले. गझलेतून व्यक्त होत मानसिकदृष्ट्या सबल झाले. कविता आणि गझल माझ्या जगण्याचे स्फुरण आहेत. हा सन्मान माझ्यासाठी एक जबाबदारी असून लेखनात नाविन्य ठेवण्याचा प्रयत्न करेन.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत दीपक करंदीकर यांच्यासमवेतच्या मैत्रीचा धागा उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर लेखन भूषण कटककर यांचे होते. परिचय मृणाल जैन यांनी करून दिला.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते.
Comments
Post a Comment