तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’च्या हिंदी आवृत्तीचे सोमवारी प्रकाशन
तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित
‘आवर्तन’च्या हिंदी आवृत्तीचे सोमवारी प्रकाशन
पुणे : तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल, अभिजात अकादमीतर्फे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचा प्रकाशन समारंभ सोमवारी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मयूर कॉलनीतील एमइएस ऑडिटेरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘आवर्तन’ ग्रंथाचे प्रकाशन संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक पद्मश्री शेखर सेन यांच्या हस्ते होणार असून पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, पुस्तकाच्या अनुवादक विद्याहरि देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आवर्तन गुरुकुलचे कार्यकारी विश्वस्त शिरीष कौलगुड, विश्वस्त अनिता संजीव, तालयोगी आश्रमाचे विश्वस्त मंदार जोशी यांनी आज (दि. ६) पत्रकार परिषदेत दिली.
पुस्तक प्रकाशन समारंभानिमित्त तालवाद्य प्रस्तुतीचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सावनी तळवलकर (तबला), ईशान परांजपे (काहोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश), अमेय बिच्चू (संवादिनी) यांचा सहभाग असणार आहे.
पुस्तकाविषयी…
‘आवर्तन’ पुस्तकाच्या माध्यमातून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या सात दशकांच्या कठोर तपस्येचा, त्यांच्या गुरूंनी दिलेल्या संस्कारांचा आणि संगीताप्रती असलेल्या निष्ठेचा लेखाजोखा मांडला आहे. पंडितजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ तबलावादनावर भाष्य केलेले नसून संपूर्ण भारतीय संगीताच्या सिद्धांतांचे सखोल विश्लेषण केले आहे. संगीत कलेचे शास्त्र, लय-तालाचे तत्त्वज्ञान, त्यांचे आयाम, साथसंगतीचे महत्त्व, गुरू-शिष्य परंपरा, सांगीतिक क्षेत्रातील घराणी तसेच कर्नाटकी व हिंदुस्थानी संगीत पद्धतींचा समन्वय अशा अनेक पैलूंवर भाष्य केले आहे. ही साहित्यकृती येणाऱ्या पिढीसाठी एखाद्या गुरुधनाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल.
Comments
Post a Comment