पुण्यात बॅडमिंटन स्मारक आणि स्टेडियम उभारणार- महापौरांची घोषणा, पीडीएमबीएकडून खेळाडूंवर कौतुकाची थाप
पुण्यात बॅडमिंटन स्मारक आणि स्टेडियम उभारणार
- महापौरांची घोषणा, पीडीएमबीएकडून खेळाडूंवर कौतुकाची थाप
पुणे, ३० एप्रिल २०२६: - 'बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुण्यात झाला आणि हे जगाला दाखवण्यासाठी पुणे महानगरपालिका एक “दू पूना गेम मेमोरियल”ची उभारणी करणार आहे. पुण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करता यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम उभारणार,' अशा घोषणा महापौर मंजुषा नागपुरे यांनी केल्या. यासाठी महानगरपालिकेला पीडीएमबीएचे सहकार्य अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या (पीडीएमबीए) वतीने गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिका-यांचा गौरव करण्यात आला. पीडीएमबीएच्या गौरवशाली वाटचालीची ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष 'लोगो'चे अनावरण करण्यात आले. या निमित्ताने आयोजित सोहळ्यात विविध वयोगटातील आणि विभागातील १५० गुणवंत खेळाडूंचा सन्मान केला गेला. शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच सीए गिरिश नातु ह्यांच्या उपस्थितीत रंगला.
गिरीश नातु ह्यांनी आपल्या भाषणात युवा खेळाडूंना एकत्रित सराव करण्याचे फायदे विशद केले. तसेच पुण्यातील विविध बॅडमिंटन अकादमींचे मानांकन करण्याची सूचना संघटनेला केली.
या वेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, मानद सरचिटणीस सीए रणजित नातु, पीडीएमबीचे खजीनदार सारंग लागू आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
अचानक मुंबईहून बैठकीचा निरोप आल्याने उपस्थित राहू ना शकलेल्या महापौर मंजुषा नागपुरे ह्यांचे भाषण वाचून दाखवण्यात आले. त्यात त्या म्हणाल्या, 'पुण्यातील बॅडमिंटन सुविधा तांत्रिकदृष्ट्या अचूक असाव्यात आणि त्यांचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने व्हावे, यासाठी महानगरपालिका पीडीएमबीए सोबत मिळून काम करेल. हे स्मारक उभारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे राखण्यासाठी आम्हाला या संस्थेचे सहकार्य लागेल. पुण्यातील बॅडमिंटनपटूंना सुविधांसाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये, यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळतील आणि ते उच्च ध्येये गाठू शकतील, हा आमचा प्रयत्न आहे.' त्या पुढे म्हणाल्या, की पुणे महानगरपालिका पुण्यातील क्रीडा पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे पी. ई. सोसायटीने आजवर पीडीएमबीएला सहकार्य केले आहे, तसेच ते भविष्यातही कायम राहील, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
सन्माननीय पुरस्कर्ते : आदित्य त्रिपाठी, राधा गाडगीळ, युतिका चव्हाण, शर्वरी रांजणे, सोयरा शेलार, अनन्या अगरवाल, कायरा रैना, आर्या भिवपाठकी, यश शहा, अनन्या गाडगीळ, रुचा सावंत, साद धर्माधिकारी, श्रुती मुंदडा, तनिष्का देशपांडे, तारा शहा, आर्या ठाकरे, ध्रुव ठाकरे, वरुण कपूर, पूर्वा बर्वे, अदिती रोडे, हर्षद भागवत, कांचन साने, मंजुषा सहस्रबुद्धे, राजश्री भावे, सुरेश अय्यप्पन, निखिल कानिटकर, सिद्धार्थ पळणीटकर.
पूना गेम ऑनर (विशेष सन्मान) सन्मानार्थी : कायरा रैना, युतिका चव्हाण, आदित्य त्रिपाठी, राधा गाडगीळ, आर्या ठाकरे, ध्रुव ठाकरे, अदिती रोडे, सुरेश अय्यप्पन, राजश्री भावे, हर्षद भागवत, कांचन साने.
प्रशिक्षक : अनिल मोडक, निखिल कानिटकर, हेमंत हार्डिकर.
Comments
Post a Comment