परंपरा आणि आधुनिकतेचा सुमधुर संगमऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘युवा स्वरानुभूती’ मैफलअद्वैत गाडगीळ यांचे सतार वादन तर आदित्य मोडक यांचे गायन


परंपरा आणि आधुनिकतेचा सुमधुर संगम

ऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘युवा स्वरानुभूती’ मैफल

अद्वैत गाडगीळ यांचे सतार वादन तर आदित्य मोडक यांचे गायन

पुणे : परंपरा आणि आधुनिकता यांचा सुमधुर संगम साधत रसिकांना मिळाली अनोख्या स्वर आणि तालाची भेट! निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ आयोजित ‘युवा स्वरानुभूती’ या सांगीतिक मैफलीचे.

कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे शनिवारी ‘युवा स्वरानुभूती’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातील आश्वासक सतार वादक अद्वैत गाडगीळ यांच्या वादनाने झाली. त्यांनी राग पूरिया धनश्रीमधील आलाप, जोड सादर करून राग मिश्र पिलूमधील बंदिशी ऐकविल्या. राग झिंझोटीमधील एक रचना ऐकवून त्यांनी मैफलीची सांगता केली. सतारीचा नाजूक झंकार आणि भारावलेल्या सुरातून नादमाधुर्याची निर्मिती झाली. रसिक सतारीतून उमटणाऱ्या झकांरांवर आनंद लहरींचा अनुभव घेत गाडगीळ यांना भरभरून दाद देत होते. त्यांना ओंकार तोडकर (तबला) यांनी लयबद्ध साथ केली तर तानपुरा साथ लोकेश कुलकर्णी यांची होती.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध युवा गायक आदित्य मोडक यांची गायन मैफल रंगली. त्यांनी सुरुवातीस ग्वाल्हेर घराण्याचे वैशिष्ट्य असणारा राग यमन सादर करताना ‘ए रि लाल मिले’ ही बंदिश ऐकवून द्रुत लयीत पंडित अंतूबुवा जोशी रचित ‘ननदींके बचनवा’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर गुरू पंडित राम देशपांडे रचित ‘देर ना देर ना देर ना तनन’ हा तराणा लिलया सादर केला. रागेश्री राग सादर करताना मोडक यांनी ‘प्रथम सूर साधे’ ही पारंपरिक रचना ऐकवून त्याला जोडून ‘बेला चमेली’ ही पंडित ओंकारनाथ ठाकूर यांची अनवट बंदिश सुमधुरपणे सादर केली. राजाभाऊ कोगजे यांनी रचलेली ‘हमे दम दैके सौतन घर जाना’ ही ठुमरी ऐकवून त्यांनी रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता गुरू पंडित राम देशपांडे रचित ‘लगन लागी श्याम से’ या भैरवीने केली. आवाजातील माधुर्य, रागातील बारकाव्यांची स्पष्ट मांडणी, गायनातील सहजता आणि दमदार सादरीकरणातून आदित्य मोडक यांनी रसिकांकडून दिलखुलास दाद घेतली. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), अथर्व अभ्यंकर, कन्हैया बाहेती (तानपुरा) यांनी समर्पक व समंजस साथ केली.

रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना भरभरून दाद देत मैफलीचा आनंद घेतला. कलाकारांचा सत्कार प्रकाश गुरव, अरुण देशपांडे यांनी केला. तर सूत्रसंचालन आणि कलाकारांचा परिचय श्रुती पोरवाल यांनी करून दिला.

 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य