केईएम हॉस्पिटल पुणे येथे ॲलर्जी क्लिनिकचे उद्घाटन· योग्य उपचार आणि निदानामुळे ॲलर्जीसोबत त्रासाशिवाय जगणे शक्य - तज्ञ



केईएम हॉस्पिटल पुणे येथे ॲलर्जी क्लिनिकचे उद्घाटन
· योग्य उपचार आणि निदानामुळे ॲलर्जीसोबत त्रासाशिवाय जगणे शक्य - तज्ञ
 
पुणे,22 एप्रिल 2026 : सर्व वयोगटांमध्ये ॲलर्जीच्या विकारांचे वाढते प्रमाण हाताळण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत केईएम हॉस्पिटल पुणे येथे ॲलर्जी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ॲलर्जी ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे.याचे अनेक वेळा निदान होत नाही.या पार्श्वभूमीवर अचूक निदान,लक्ष्यित उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक सेवा प्रदान करणे हे या क्लिनिकचे उद्दिष्ट आहे.वाढते प्रदूषण,जीवनशैलीतील बदल,आहाराच्या सवयींमध्ये बदल आणि नैसर्गिक वातावरणाशी संपर्क कमी होत चाललेला संपर्क यामुळे विशेष करून शहरी भागांमध्ये ॲलर्जी संबंधित समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा उपक्रम त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी,मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया,मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा,पेडियाट्रिक्स विभागाचे संचालक डॉ.आशिष बावडेकर, ईएनटी व बिग ईअर्स विभागाच्या प्रमुख डॉ.नीलम वैद्य, ॲलर्जी स्पेशालिस्ट डॉ.बेला गांधी, डॉ.कीर्ती श्रोत्रीया आणि डॉ.शुभांगी आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.  

नव्याने सुरू झालेल्या ॲलर्जी क्लिनिकमध्ये सुसज्ज,आधुनिक निदान व उपचारांच्या सर्वसमावेशक सेवा उपलब्ध आहेत.त्यामध्ये ॲलर्जीचे सविस्तर मुल्यांकन (इव्हॅल्युएशन),रूग्णाचा वैद्यकीय इतिहास समजून घेणे,स्क्रीन प्रिक टेस्टींग,विशिष्ट रक्ताच्या चाचण्या,दम्यासाठी फुफ्फुसांच्या कार्याची चाचणी,ॲलर्जीच्या प्रकाराचे निदान इत्यादींचा समावेश आहे.दीर्घकाळ सकारात्मक प्रभाव आणि चांगली जीवनशैली मिळावी या दृष्टीने हे क्लिनिक वैयक्तिकृत उपचार योजना,इम्युनोथेरपी (ॲलर्जी वॅक्सिन्स) आणि रूग्ण समुपदेशन सेवा देखील प्रदान करेल.प्रगत स्क्रीन प्रिक टेस्टींग सिस्टिम,स्पायरोमेट्री,पल्मनरी टेस्टींग मशिन,आधुनिक ॲलर्जी ब्लड टेस्टींग सुविधा,नेब्युलायझेशन,आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणा या देखील येथे उपलब्ध आहेत.

केईएम हॉस्पिटल पुणे येथील ॲलर्जी स्पेशालिस्ट डॉ.बेला गांधी म्हणाल्या की,सध्याच्या काळात ॲलर्जीच्या समस्या अधिकाधिक प्रमाणात दिसून येत आहेत.मात्र अनेकदा त्याचे निदान होत नाही आणि म्हणून योग्य व्यवस्थापन होत नाही.अनेक रूग्णांना आपल्या ॲलर्जीचे नेमके कारण (ट्रिगर) ओळखता येत नसल्याने वर्षानुवर्षे त्रास सहन करत राहतात.अचूक निदान आणि वैयक्तिक गरजांनुसार उपचार व दीर्घकालीन व्यवस्थापन यासाठी समर्पित ॲलर्जी क्लिनिकची गरज होती.येथे एकाच छताखाली या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सेवा उपलब्ध आहेत.


योग्य उपचार आणि निदानामुळे ॲलर्जीसोबत त्रासाशिवाय जगणे शक्य - तज्ञ  

योग्य उपचार आणि निदानामुळे लोकांना ॲलर्जीसोबत त्रासाशिवाय जगणे शक्य होऊ शकते, असे डॉ. बेला गांधी यांनी सांगितले. ॲलर्जीशी संबंधित सामान्य समस्यांमध्ये ॲलर्जिक ऱ्हायनायटिस (शिंका येणे, नाक वाहणे, नाक बंद होणे), दमा, अर्टिकेरिया व एक्झिमा यांसारख्या त्वचेच्या ॲलर्जी, तसेच अन्न आणि औषधांमुळे होणाऱ्या ॲलर्जीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे, वाढत्या ॲलर्जींमध्ये विशेषतः मुलांमध्ये फूड ॲलर्जी, क्रॉनिक अर्टिकेरिया, तीव्र ॲलर्जिक दमा, तसेच प्रदूषण आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या ॲलर्जी यांचा समावेश आहे.

ॲलर्जीचा सर्व वयोगटांवर परिणाम होतो. विशेषत: लहान मुले आणि तरूणांना ॲलर्जी निर्माण करणारे पर्यावरणीय घटक संपर्कात आल्यामुळे याचा सामान्यत: त्रास होतो. प्रदूषण, जीवनशैलीतील बदल आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने शहरी भागात ॲलर्जीचे प्रमाण अधिक आहे. वाढते प्रदूषण, बदलणारे आहार, बैठी जीवनशैली आणि सूक्ष्मजंतूंशी कमी संपर्क (हायजीन हायपोथेसिस) हे घटक या वाढीस कारणीभूत ठरतात. या समस्या केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम करत नाहीत, तर दैनंदिन जीवनावरही परिणाम करतात,ज्यामुळे थकवा, अपुरी झोप, कामाच्या ठिकाणी किंवा शाळेतील कार्यक्षमता कमी होणे, वारंवार संसर्ग, गंभीर स्थितीत श्वास घेण्यास त्रास, तसेच भावनिक ताण आणि जीवनमानात घट यांसारख्या समस्या उद्भवतात.

योग्य पद्धतीने आणि सातत्यपूर्ण काळजी घेतल्यास ॲलर्जींसोबत जगणे पूर्णपणे शक्य आहे. यासाठी सर्वप्रथम ॲलर्जीची कारणे ओळखणे व टाळणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे आणि घरातील हवेची गुणवत्ता चांगली ठेवणे आवश्यक आहे. जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर केल्यास ॲलर्जीचा धोका कमी करता येतो. निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. ज्यांच्यामध्ये सातत्याने लक्षणे दिसून येतात, त्यांच्यासाठी इम्युनोथेरपी दीर्घकालीन आराम देऊ शकते, तसेच ॲलर्जी तज्ज्ञांचा नियमित पाठपुरावा केल्याने उपचार प्रभावी आणि वैयक्तिक गरजांनुसार राहण्यासाठी मदत करतो.

केईएम हॉस्पिटल पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या की, आज ॲलर्जी ही वाढती आरोग्य समस्या असून त्यासाठी विशेष आणि सातत्यपूर्ण उपचारांची आवश्यकता आहे. या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना योग्य निदान आणि उपचार देण्याबरोबरच ट्रिगर्सचे (ॲलर्जी वाढवणारे घटक) प्रभावी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल जागरूक करू इच्छितो, जेणे करून ते सामान्य आणि सक्रिय जीवन जगू शकतील.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य