सांगली, सोबो, कोल्हापूर, रायगड संघाची संयुक्त आघाडी- पहिली 'महाराष्ट्र शूटिंग लीग'- 'सोबो' आणि 'कोल्हापूर'चे तगडे आव्हान
सांगली, सोबो, कोल्हापूर, रायगड संघाची संयुक्त आघाडी
- पहिली 'महाराष्ट्र शूटिंग लीग'
- 'सोबो' आणि 'कोल्हापूर'चे तगडे आव्हान
पुणे, १७ एप्रिल २०२६: महाराष्ट्र रायफल असोसिएशन' आयोजित पहिल्या-वहिल्या 'महाराष्ट्र शूटिंग लीग स्पर्धेत चार संघांनी प्रत्येकी ४ गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेच्या ३ सामन्यांपैकी २ विजयांसह सांगली अल्फा लायन्स संघाने ४ गुण मिळवून गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. या सामन्यात रायफल संघात आदिती हडगल, प्रतीक जोंग, स्वरा मगदूम आणि अल्फिया अत्तार यांनी तर पिस्तूल संघात प्रणव पाटील, नईम नार्वेकर, वैष्णवी राजे आणि वीरेन गिरीगोसावी यांनी चांगली कामगिरी करीत संघाला अव्वल स्थान मिळवून दिले.
या स्पर्धेत सोबो जायंट्स संघाने २ सामन्यांत २ विजय मिळवत ४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत रायफल संघात भक्ती खामकर, आदिती सिंग, श्रिया गोळे आणि सारा वाडके तर पिस्तूल संघात जज मंडल, हेत पटेल, प्राज्ञा केसरकर आणि गझला नौशाद यांनी चांगला खेळ करीत विजय मिळवला.
कोल्हापूर बायसन्स संघाच्या रायफल संघात समीक्षा पाटील, सुमेध ससाणे, अथर्व पाटील आणि ज्ञानेश्वरी पाटील यांनी तर पिस्तूल संघात अनुराग चौगुले, प्रांजली धुमाळ, तेजस ढेरे आणि अभिज्ञा पाटील यांनी चांगला खेळ केला. रायगड वॉरियर्स संघाच्या रायफल संघात पार्थ राकेश माने, ईशा अनिल टाकसाळे, राहुल शर्मा आणि दिव्या राजेश धुमाळ यांनी तर पिस्तूल संघात संतोष पी. सावंत, जानवी व्ही. मानटकर, समिधा ए. चव्हाण आणि प्रियांका जी. सुस्विरकर यांनी चांगला खेळ केला.
या संघांनी आतापर्यंत अपराजित राहून प्रत्येकी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. अहिल्यानगर लक्षवीर, राजधानी सातारा, सीएसएन मार्क्समन, रत्नागिरी शिलेदार, वर्धा वॉरियर्स आणि अमरावती धुरंधर या संघांनी प्रत्येकी १ विजय नोंदवत २ गुण मिळवले आहेत. याव्यतिरिक्त सोलापूर ब्रह्मास्त्र, वेस्टर्न रेंजर्स आणि नाशिक नेमबाज यांनी प्रत्येकी १ सामना खेळला असून तो जिंकल्याने त्यांचेही २ गुण झाले आहेत.
दुसरीकडे, नागपूर टायगर्स, आम्ही पुणेकर आणि पालघर गोल्डन फिंगर या संघांना अद्याप खाते उघडता आले नाही. चंद्रपूर डायमंड्स संघाने ३ सामने खेळले असून तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने ते सध्या तळाला आहेत. स्पर्धेच्या आगामी फेरीत आघाडीचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी या संघांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनआयोजित या पहिल्या-वहिल्या 'महाराष्ट्र शूटिंग लीग' ची सुरवात पुणे येथील 'अमनोरा पार्क'मधील 'छत्रगुज नर्सेस स्कूल' येथे झाली आहे. या लीग मध्ये '10 मीटर रायफल' आणि 'पिस्तूल' या दोन्ही गटांमधील पहिल्याच पर्वात 18 जिल्हा संघ आणि 144 नेमबाज सहभागी झालेले आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सांगली, सोबो, कोल्हापूर आणि रायगड या संघांनी प्रत्येकी चार गुण मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. या संघांनी आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रत्येकी दोन विजय नोंदवले आहेत. नगर संघाला अद्याप आपला पूर्ण फॉर्म गवसलेला नसून, हा संघ २ गुणांसह सध्या पिछाडीवर आहे.
या लीगची सुरुवात महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, सरचिटणीस शीला काणूनगो, रौनक पंडित, ऑलिम्पियन राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांसह खेळाडू उपस्थित होते.
या लीगची प्रतिष्ठा आणि महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढवत, अनेक नामवंत ऑलिम्पियन आणि प्रख्यात प्रशिक्षक या स्पर्धेत 'मार्गदर्शक' म्हणून सहभागी होणार आहेत. यामध्ये राही सरनोबत, अंजली भागवत, सुमा शिरूर, दिपाली देशपांडे, रुद्रांक्ष पाटील आणि तेजस्विनी सावंत तसंच भारतीय पिस्तूल संघाचे प्रशिक्षक रौनक पंडित यांचा समावेश आहे. प्रेक्षकांना आणि नेमबाजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांना या दिग्गज व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
Comments
Post a Comment