कर्वेनगर मधील ए टी एम चे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न / शहरातील सर्वच पाण्याच्या ए टी एम ची तपासणी करणेबाबत.
प्रती,
मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय -
कर्वेनगर मधील ए टी एम चे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न / शहरातील सर्वच पाण्याच्या ए टी एम ची तपासणी करणेबाबत.
मा. महोदय,
गुरुवार व शुक्रवार च्या पाणी बंद मुळे नागरिकांचे हाल होत असताना कर्वेनगर मध्ये मात्र एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. येथे एका ठिकाणी पाण्याचे ए टी एम मशीन बसविण्यात आले असून अवघ्या एक रुपयात एक लिटर पाणी मिळत होते. या भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी असल्यामुळे रुपयात बिसलरी म्हंटल्यावर गर्दी होती. या पाण्याच्या दर्ज्याबाबत व असे मनपा चे पिण्याचे पाणी किंवा बोर चे पाणी उपसा करून विकता येते कां अशी शंका आल्यामुळे मी ह्या भागाच्या पाणी खात्याच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई मॅडम यांना तक्रार केली. त्यांनी त्वरित येथील पाणी तपासणीस पाठविले असता सदर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
मात्र आत्ता सकाळी येथे पाहणी केली असता विद्यार्थी पाणी विकत घेत असल्याचे दिसून आले. "येथे 5 रुपयात 10 लिटर पाणी मिळत असून ते आम्हाला दिवसभर पिण्यास उपयुक्त असल्याचे नांदेड च्या ह्या विद्यार्थ्याने सांगितले ".
ह्या निमित्ताने असा प्रश्न उपस्थित होतो की...
1) अश्या पद्धतीने पाणी विक्री करता येते कां ?
2) पाणी पिण्यास अयोग्य असल्यास तेथे तसा फलक नसल्याने उद्या नागरिक आजारी पडल्यास जबाबदार कोण ?
3) शहरात अश्या प्रकारच्या पाण्याचे किती ए टी एम आहेत व यांना मनपा ने रीतसर परवानगी दिली आहे काय ?
तरी कृपया आरोग्य निरीक्षक व पाणी खात्याच्या अभियांत्यांना याची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व दूषित पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
Comments
Post a Comment