शास्त्रीय गायन, नाट्यसंगीतातून आप्पासाहेब जळगावकर यांना स्वरांजलीपं. काणेबुवा प्रतिष्ठान, गांधर्व महविद्यालय, पुणेतर्फे आयोजन
शास्त्रीय गायन, नाट्यसंगीतातून आप्पासाहेब जळगावकर यांना स्वरांजली
पं. काणेबुवा प्रतिष्ठान, गांधर्व महविद्यालय, पुणेतर्फे आयोजन
पुणे : सुश्राव्य, दमदार शास्त्रीय गायन आणि बहारदार नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून सुप्रसिद्ध संवादिनीवादक पंडित आप्पासाहेब जळगावकर यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली.
पंडित द. वि. काणेबुवा प्र तिष्ठान आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर जन्मशताब्दी सांगता समारोहाचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. सांगीतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या प्रसंगी भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, द.वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या सचिव विदुषी मंजुषा पाटील, विजयकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कलाकारांचे व मान्यवरांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, विजयकांत कुलकर्णी, श्याम जोशी, सुनील गोडबोले, शीला देशपांडे यांनी केले.
विदुषी मंजुषा पाटील यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग मुलतानीमधील ‘गोकुल गावन का छोरा रे’ या सुप्रसिद्ध बंदिशीने केली. त्यानंतर ‘तुम बिन मानत नाही जियरा मोरा’ ही बंदिश प्रभावीपणे सादर करून ‘सावरे के गुण लागी मनमे’ ही रचना ऐकविली. ‘झुला धीरे से झुलावो बनवारी रे’ या रचनेच्या सादरीकरणातून रसिकांना मोहित केले.
दुसऱ्या सत्रात गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि गायक अभिनेते ऋषिकेश बडवे यांच्या नाट्यसंगीताची मैपल रंगली. अस्मिता चिंचाळकर यांनी ‘मम सुखाची ठेव ही’ (स्वयंवर), ‘मला मदन भासे हा’ (मानापमान), ‘पतीत तू पावना’ (कान्होपात्रा) ही नाट्यपदे सुमधुरपणे सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. ऋषिकेश बडवे यांनी ‘रवी मी’ (मानापमान), ‘कोण तुज सम सांग मज गुरुराया’ (सौभद्र), ‘आज सुगंध आला लहरत’ (हे बंध रेशमाचे) ही नाट्यपदे सुश्राव्य स्वरात सादर केली.
कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या मैफलीने झाली. त्यांनी राग यमन कल्याणमधील ‘पिया बिन रतिया बैरन भई’ ही सुप्रसिद्ध बंदिश ताकदीने सादर करून द्रुत लयीत ‘श्याम बजाए आज मुरलिया’ ही रचना ऐकविली. कार्यक्रमाची सांगता जगद्गुरू संत तुकाराम महाराज रचित ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा’ या भक्तीरचनेने करत असताना त्यात ‘कायो करुणानिधे’ या कानडी भक्तीरचनेचे सूर मिळवत रसिकांना भक्तीरसाची अनुभूती दिली.
Comments
Post a Comment