गुरू-देव स्वरोत्सवा’तून श्रद्धा, भक्तीचे सुरेल दर्शन
‘गुरू-देव स्वरोत्सवा’तून श्रद्धा, भक्तीचे सुरेल दर्शन
पुणे : गुरुंप्रतीची श्रद्धा, भक्ती, प्रेम याने भारावलेली सुरेल सांज पुणेकर रसिकांनी अनुभवली. निमित्त होते ‘गुरू-देव स्वरोत्सवा’चे.
पंडित गजानन बुवा जोशी व पंडित भालचंद्र देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रसिद्ध व्हायोलिन वादक चारुशीला गोसावी यांच्या संकल्पनेतून ‘गुरू-देव स्वरोत्सवा’चे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चारुशीला गोसावी यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग मियाँ मल्हारने केली. शांत, संयमी परंतु बहारदार वादनातून रसिकांना मोहित करत त्यांनी तीन तालातील एक चीज ऐकविली. त्यानंतर व्हायोलीनमधून उमटणाऱ्या आर्त स्वरातून ‘याद पिया की आये’ ही ठुमरी नजाकतीने सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. त्यांना मोहन पारसनीस यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि गुरू डॉ. विकास कशाळकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात पंडित गजानन बुवांच्या आवडत्या छायानट या रागाने केली. ‘गरवा कैसे’, ‘मलानिया गुंद लाओ री’, ‘पिया बन जा’ या आग्रा घराण्यातील रचना ऐकवून ‘बिगीबेगी आओ सैया’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. तानांमधील वैविध्य, दमदार गायकी आणि रागातील बारकावे दर्शविणाऱ्या सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. कशाळकर यांनी दुर्मिळ रागातील बंदिश तसेच ‘करन मोरी लागी कलाई’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता तराण्याने केली. त्यांना परिमल कोल्हटकर (स्वरसाथ), दिपीन दास (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने मैफलीत रंग भरले. आनंद देशमुख यांच्या निवेदनाचा जागतिक स्तरावर सन्मान झाल्याने त्यांचा चारुशीला गोसावी व राजय गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment