नेमबाजीच्या रणांगणात ‘सोबो जायंट्स’चा झेंडा- पालघर गोल्डन फिंगरला नमवत पटकावले विजेतेपद- पहिली महाराष्ट्र शुटिंग लीग


नेमबाजीच्या रणांगणात ‘सोबो जायंट्स’चा झेंडा
- पालघर गोल्डन फिंगरला नमवत पटकावले विजेतेपद
- पहिली महाराष्ट्र शुटिंग लीग

पुणे, २० एप्रिल २०२६: अत्यंत चुरशीच्या आणि श्वास रोखून धरणाऱ्या वातावरणात पार पडलेल्या पहिल्या वहिल्या महाराष्ट्र शुटिंग लीग मध्ये 'मिक्स' गटाच्या अंतिम सामन्यात सोबो जायंट्स संघाने आपले वर्चस्व सिद्ध करत जेतेपदावर नाव कोरले आहे. अंतिम लढतीत त्यांनी पालघर गोल्डन फिंगर संघाचा १७-७ असा धुव्वा उडवला. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या सामन्यात आम्ही पुणेकर संघाने बाजी मारली.

महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. त्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील, एनआरएआय संस्थेचे पवन सिंह, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस संजय शेटे, नामदेव शिरगावकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, दीपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत, सुमा शिरूर, राही सरनोबत आणि रौनक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सोबो जायंट्सच्या नेमबाजांनी सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. अदिती, श्रिया, जज आणि प्राज्ञा यांच्या अचूक वेधामुळे सोबो जायंट्सने १७ गुण मिळवले. त्याउलट, पालघर गोल्डन फिंगर संघाला केवळ ७ गुणांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे सोबो जायंट्सने स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेला सामना अधिक रंगतदार झाला. सांगली अल्फा लायन्स आणि आम्ही पुणेकर यांच्यात झालेल्या या अटीतटीच्या लढतीत आम्ही पुणेकर संघाने १६-१४ अशा निसटत्या फरकाने विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले. सांगलीच्या संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, मात्र पुण्याच्या सुहास, साक्षी, प्रथमेश आणि तेजस या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संयम राखत विजय खेचून आणला.

स्पर्धेत सांघिक कामगिरीसोबतच वैयक्तिक कौशल्याची मोठी कसोटी लागली होती. यामध्ये अमरावती धुरंधर संघाच्या गोजिरी घाडगे हिने उत्कृष्ट तंत्र आणि एकाग्रतेचे दर्शन घडवत 'बेस्ट रायफल शूटर' हा किताब आपल्या नावे केला. तिच्या या यशामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तर सोबो जायंट्सच्या जज याने ४२ वेळा अचूक वेध घेत पिस्तुल प्रकारात स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत बेस्ट पिस्तुल शूटर म्हणून गौरवण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य