तपस्या पुरस्काराने मातृशक्तीचा सन्मान ही देखणी गोष्ट : गिरीश कुलकर्णीमूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णीशीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरवस्वानंदी क्रिएशन, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे सन्मान सोहळा
तपस्या पुरस्काराने मातृशक्तीचा सन्मान ही देखणी गोष्ट : गिरीश कुलकर्णी
मूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णी
शीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरव
स्वानंदी क्रिएशन, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे सन्मान सोहळा
पुणे : समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी स्वत:चा लोप करून खंबीरपणे उभे राहणाऱ्या, व्यक्ती आणि समाज एकत्र येण्यासाठी, कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी निरलसपणे कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा तपस्या पुरस्काराने सन्मान होणे ही अत्यंत देखणी गोष्ट वाटते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.
कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त ‘स्वानंदी क्रिएशन’ पुणे आणि ‘केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे’ ‘तपस्या पुरस्काराने' २००९ पासून सन्मानित करण्यात येते. यंदा प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक, आयटी क्षेत्रात असलेल्या योगेश फाटक यांच्या मातोश्री शीला रत्नाकार फाटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या सुमित आणि अमित पवार यांच्या मातोश्री सीमा सुभाष पवार यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि हिंदीच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे यांच्या हस्ते आज (दि. ३१) झाले. त्या वेळी गिरीश कुलकर्णी बोलत होते. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी क्रिएशन पुणेच्या अपर्णा केळकर, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सचे मकरंद केळकर मंचावर होते. रोख रक्कम, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सुरुवातीस प्रास्ताविकात अपर्णा केळकर यांनी तपस्या पुरस्कारामागील भूमिका मांडताना हा पुरस्कार म्हणजे एक कृतज्ञता सोहळा असून कलाकार आणि समाजसेवकामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या, त्यांच्या कार्यात प्रेरणा देणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव आहे. या पुरस्कारातून कुटुंब अधिक जवळ येत आहेत याचा विशेष आनंद असून या जाणिवेची ज्योत तेवत ठेवावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, आजच्या सामाजिक काळात मूल्यहीनता जाणवत असताना, माणसे एकटी पडत असताना, शहरे बकाल होत असताना, कुटुंब पातळीवर संवाद कमी होत असताना खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचे कार्य कौतुकास्पद आहे.
प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीचे, कुटुंबाचे यश समाजासमोर लखलखीतपणे जाणवते, पण त्या यशामागे घरातील कुणी एक स्त्री शक्ती खंबीरपणे उभी राहिलेली असते. या व्यक्तीला गृहीत धरले जाते. परंतु तपस्या पुरस्काराच्या माध्यमातून अशा स्त्री शक्तीचे कर्तृत्व हेरून सन्मान केला जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
सत्काराला उत्तर देताना शीला फाटक म्हणाल्या, घरामध्ये सांस्कृतिक वातावरण होते; परंतु कुणी कलेच्या क्षेत्रात कार्यरत नव्हते. निखिलचा तबलावादनाकडे असणारा ओढा, कलागुण लक्षात घेऊन त्याला घरातून कायमच प्रोत्साहन दिले. त्याच्या यशात त्याने केलेल्या मेहनतीचा, गुरूंच्या शिकवणुकीचा मोठा वाटा आहे. सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर माझ्या मनात असलेल्या नवनवीन गोष्टी करण्याच्या इच्छा जिद्दीने पूर्ण करून जीवनाचा रसरशीत आनंद उपभोगत आहे. निखिलला मिळालेली शर्वरीची साथ एकमेकांना पूरक असल्यामुळे दोघांची कलेच्या क्षेत्रातील प्रगती उत्तम आहे, याविषयी आनंद आहे.
आईला मिळालेला तपस्या पुरस्कार हा फक्त तिचा वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व कार्यकर्त्यांच्या घरातील स्त्री शक्तीला समर्पित आहे, अशा भावना सीमा पवार यांचे चिरंजीव सुमित पवार यांनी व्यक्त केल्या.
मान्यवरांचे स्वागत अपर्णा केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे होते तर आभार मकरंद केळकर यांनी मानले.
Comments
Post a Comment