जागतिक महिला दिना निमित्त महिलांसाठीचा रोजगार मेळावा संपन्नविविध नामांकित औद्योगिक कंपन्यांसाठी मुली आणि महिला उमेदवारांची प्राथमिक निवड
जागतिक महिला दिना निमित्त महिलांसाठीचा रोजगार मेळावा संपन्न
विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांसाठी मुली आणि महिला उमेदवारांची प्राथमिक निवड
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांचा संयुक्त उपक्रम
पुणे: दिनांक 18 मार्च 2026: पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार मुली आणि महिलांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील यशस्वी भवन येथे बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुली आणि महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याला एकूण 53 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवला.या रोजगार मेळाव्यात दहावी उत्तीर्ण,बारावी उत्तीर्ण, आय टी आय, डिप्लोमा व पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता धारक मुली आणि महिला उमेदवारांनी ट्रेनी ऑपरेटर,क्षेत्र अधिकारी अशा विविध पदांसाठीच्या रिक्त पदांसाठी मुलाखती दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी एज्युकेशन सोसायटी सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांची उपस्थिती होती. तसेच पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सचिन ढेरे, तसेच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे पदाधिकारी सुनील नाळे यांच्यासह यशस्वी संस्थेचे प्रमुख मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, ऑपरेशन विभाग प्रमुख नितीन थेटे यासह औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी मुली आणि महिलांनी औद्योगिक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार संधींची माहिती घेऊन स्वतःचे करिअर घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
तर यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास विभागाचे पदाधिकारी सुनील नाळे यांनी विभागाच्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर रोजगार संधीसाठी मुली आणि महिला उमेदवारांनी मोफत नाव नोंदणी करावी असे आवाहन केले.या संकेतस्थळा मार्फत 18,000 हून अधिक नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील रोजगार संधी गरजू उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अश्विनी ताकटे यांनी केले.या रोजगार मेळाव्यासाठी चाकण, भोसरी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, हडपसर इत्यादी पुणे जिल्ह्यातील विविध एमआयडीसी परिसरातील नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील 410 रिक्त पदांच्या रोजगार संधीसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
Comments
Post a Comment