देशात २० टक्के उद्योग क्षेत्रात महिला*
*देशात २० टक्के उद्योग क्षेत्रात महिला*
खासदार डॉ.मेधा कुलकर्णी : गौरी जोशी, डॉ.अमृता चांदोरकर यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान : याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे आयोजन
पुणे : देशाच्या जीडीपीमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचे योगदान आपण मोजत नाही. भारतात उद्योग क्षेत्रात २० टक्के महिला कार्यरत असून जीडीपी च्या १७ टक्के महिलांचे योगदान आहे. महिला अनेक अडचणींचा सामना करून उद्योग क्षेत्रात स्थान निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी एकमेकींना आधार देऊन पुढे जायला हवे. तसेच स्वतःमधील संवेदनशीलतेला आपली ताकद बनवावी, असे मत खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दिलीप कुंभोजकर आदी उपस्थित होते.
सोहळ्यांतर्गत स्वयंसिद्धा पुरस्कार जी.आर. इंजिनिअरींगच्या संचालिका गौरी जोशी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार निरामय वेलनेस च्या संचालिका डॉ.अमृता चांदोरकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
युवा उपक्रमांतर्गत कै.सौ.सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या माणिक सुपेकर, प्रतिभा संगमनेरकर, डॉ.स्वाती कुलकर्णी, श्रीकांत जोशी, उपेंद्र केळकर, मंजुषा वैद्य आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
पुरस्काराला उत्तर देताना गौरी जोशी म्हणाल्या, विश्वास, दर्जा आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर आम्ही यशस्वी होत आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्योजकता वाढावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृता चांदोरकर म्हणाल्या, 'निरामय' वेलनेस मध्ये आलेल्यांच्या विचारांवर आम्ही काम करतो. एखाद्या व्याधीतून बरे व्हायचे असेल, तर चांगला विचार करायला हवा. विना औषध, विना स्पर्श उपचार ही संकल्पना घेऊन आम्ही कार्यरत आहोत. ऊर्जेच्या प्राचीन शास्त्रात आमचे काम सुरु असले तरी देखील आधुनिक युगात ते उपयोगी पडत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विश्राम कुलकर्णी म्हणाले, सन १९४० साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेला आता ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेचे विविध उपक्रम सुरु आहेत. त्यामध्ये विद्यार्थांना खाद्य सबसिडी, वेद विद्या संवर्धन, वधू वर सूचक मंडळ, उद्योजकता विकास असे अनेक उपक्रम संस्था राबवीत आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर व्यवसायिक व नोकरदार महिलांसाठी 'व्यावसायिक कार्यामध्ये शिष्टाचार' या एका महत्त्वाच्या सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. जयश्री फडणवीस मार्गदर्शन केले. युवा उपक्रमाबद्दल श्रीकांत जोशी यांनी माहिती दिली. माणिक सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रतिभा संगमनेरकर यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment