झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस
‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही. धार्मिकता वेगळी असली तरी गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, करूणा आणि मावनतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ या पुस्तकातून सत्तेचे दर्शन घडते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
झेन मास्टर सुदस्सन लिखित ‘झेन कथा’ आणि प्रा. सुधीर भालेराव लिखित ‘कात्रजचा घाट’ पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. १५) डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिने कला दिग्दर्शक संतोष संखद, मैत्री प्रकाशनच्या मोहिनी कारंडे मंचावर होते.
जीएसटी अधिकारी प्रज्ञा बनसोडे-शिंदे, रमाई स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांची उपस्थिती होती. डॉ. सबनीस पुढे म्हणाले, संत आणि महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यास जगात शांतता नांदेल.
संतोष संखद म्हणाले, झेन कथा या पुस्तकातून आयुष्याचे सार सांगितले आहे तर कात्रजचा घाट पुस्तकातील कथांमधून आपल्यासमोर खरीखुरी पात्रे उभी राहतात.
लेखनाविषयी बोलताना प्रा. सुधीर भालेराव म्हणाले, समाजात चांगली-वाईट माणसे असतात मात्र सकारात्मक दृष्टीकोनातून लिखाण केले आहे. झेन मास्टर सुदस्सन म्हणाले, बोधकथांची सूत्रबद्ध मांडणी पुस्तकात केली आहे. झेन कथा या अत्यंत प्रेरणादायक आहेत, अंर्तगामी मन विकासासाठी त्या अत्यंत आवश्यक असतात. प्रास्ताविक मोहिनी कारंडे यांनी केले. ललिता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment