राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

 

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’, ‘जोग’ आदी सायंकालीन व रात्रौकालीन रागांचा आनंद रसिकांना सकाळच्या प्रहरात अनुभवायला मिळाला. कालप्रहराचे बंधन न स्वीकारता झालेले सादरीकरण रसिकांनी सहजतेने स्वीकारत त्यांचा आनंद घेत उपक्रमाला भरभरून दाद दिली.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सव व परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पद्श्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण झाले.

 

संगीतोत्सवाचे उद्‌घाटन पंडित अरुण कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

 

बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य : पंडित अरुण कशाळकर…

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित अरुण कशाळकर म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात परंपरा कितीही घट्ट असल्यातरी कालानुरूप त्यात बदल होत असतात. हे बदल होणे म्हणजेच कला जीवंत असण्याचे लक्षण होय. बदलांची प्रक्रिया सातत्याने घडत असते आणि या बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य मिळते. बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून त्या करिता विचारांचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. कलाकार या बदलातून कलेला एक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. हे रुजलेले बदल परंपरा रूपाने पुढे येत जातात.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ ही अभिवन संकल्पना राबविणारे पुणे हे पहिले शहर आहे, याचे कौतुक वाटते.

 

संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग म्हणून प्रचलित असलेला राग मारवा सादर करून त्यानंतर राग केदारची झलक दर्शविली. सायंकाळी व्याकुळ करणाऱ्या स्वरांची जादू रसिकांना सकाळच्या प्रहरातही मोहित करून गेली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागराज नागेश (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

या नंतर पंडित रोणु मजुमदार यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरात सादर होणारा राग बिहाग अतिशय तरलतेने साकारला. कुठलाही राग कुठल्याही वेळी प्रभाव पाडू शकतो या प्रभाताईंच्या विचाराला समर्पक असे हे सादरीकरण रंगले. यानंतर त्यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवत राग जोगबहार या जोड रागाची झलक ऐकविली. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित रामदास पळसुले (तबला), कल्पेश माचला (बासरी सहवादन) यांनी रंगतदार साथ केली.

पंडित आनंद भाटे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग मालकंस ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यानंतर राग बसंत मल्हारमधील सुमधुर रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), स्वप्नील गायकवाड, ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.

सकाळच्या सत्राची सांगता बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित साजन मिश्रा व त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी जोग रागाचे मनमोहक दर्शन घडवत रसिकांना अनोखा आनंद दिला. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर एक महान चिंतक होत्या, असे सांगून रागप्रहराच्या पलिकडे जाऊन केलेले सादरीकरण हे त्यांच्या संकल्पनेला अनुरूप असल्याचे पंडित साजन मिश्रा म्हणाले. चारूकेशी रागातील गुरूंचे महात्म्य सांगणाऱ्या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. राहुल गोळे (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.

 

कलाकारांचा सत्कार डॉ. अशोक वळसंगकर, संवादचे सुनील महाजन, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

 

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रागप्रभा मैफलीचा रसिकांनीही मनमुराद आस्वाद घेतला आणि कलाकारांना पुणेकर रसिकांनी हृदयापासून मानवंदना दिली.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य