पारंपरिक मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन*गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; वेत्र चर्म, लाठी काठी प्रात्यक्षिके, ढोल ताशा वादन व महिलांच्या हस्ते शिवआरती
*पारंपरिक मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन*
गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; वेत्र चर्म, लाठी काठी प्रात्यक्षिके, ढोल ताशा वादन व महिलांच्या हस्ते शिवआरती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती... ढोल-ताशांचा गजर व शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण... रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण...पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला... अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्रचे महामंत्री स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब दादाराम जाधव -नाईक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, भविष्य निर्वाह निधी, भारत सरकार आयुक्त अमित वसिष्ठ, नगरसेवक स्नेहल माळवदे, ऐश्वर्या थोरात यांसह मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच केशव शंखनाद पथक, हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. ढोल ताशा पथकांनी देखील उत्तम सादरीकरण करीत मिरवणुकीत सहभाग घेतला.
किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळ प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता विविध स्पर्धांसारखे उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment