रागांची सुंदरता उलगडल्यास रसिकांची मिळते दाद : पंडित हरिप्रसाद चौरसिया
रागांची सुंदरता उलगडल्यास रसिकांची मिळते दाद : पंडित हरिप्रसाद चौरसिया
पुणे म्हणजे कलाकारांसाठी स्वर्गच : पंडित हरिप्रसाद चौरसिया
रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन आयोजित बासरी परंपरा संगीत महोत्सव
पुणे : कालानुरूप स्वरांचा अंदाज बांधून विस्तार करत त्यांना तालात बसवत रागांची निर्मिती केली. एखाद्या रागानिर्मितीचा विचार करताना त्याच्या सादरीकरणातून आत्मिक सुंदरता रसिकांसमोर उलगडल्यास त्याला भरभरून दाद मिळते, अशा भावना पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केल्या. पुणे म्हणजे कलाकारांसाठी स्वर्ग असून जो कलाकार पुण्यात सादरीकरण करतो त्याला स्वर्गीय अनुभूती मिळते, असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे बासरीवादक मृगेंद्र मोहाडकर यांनी “बासरी परंपरा” या दोन दिवसीय अद्वितीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात शनिवारी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याशी संवादात्मक कार्यक्रम आणि त्यांनी निर्माण केलेल्या रागांविषयी जाणून घेत त्यांचे प्रात्यक्षिक या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंडित चौरसिया यांनी निर्मिती केलेल्या ‘प्रभातेश्र्वरी’, ‘इंदिराकल्याण’, ‘कलारंजनी’, ‘हरिप्रिया’, ‘मधुमल्हार’ या रागांच्या निर्मितीमागील संकल्पना विशद केली. या रागांचे सादरीकरण पंडित रूपक कुलकर्णी यांनी केले तर गीता बलसारा यांनी संवाद साधला. पूना वेस्टर्न क्लब, भूगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशसेवा समिती यांच्या सहकार्याने महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
एका वाळलेल्या बांबूतून निर्माण झालेल्या बासरी या सुमधुर वाद्याची निर्मिती झाली असे सांगून पंडित चौरसिया म्हणाले, विद्यार्थ्यांच्या बासरीवादनातून मलाही आनंद मिळतो. जणू मीच वादन करीत आहे, अशी अनुभूती येते.
बासरी परंपरा महोत्सवाची सुरुवात बासरी वादक जयतीर्थ कुलकर्णी यांनी मारवा रागाने केली. त्यांनी विलंबित एकताल सादर करून द्रुत एकतालातील सुमधुर रचना ऐकविली. गायकी अंगाने वादन करणाऱ्या जयतीर्थ कुलकर्णी यांनी आपल्या वादनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना डॉ. अतुल कांबळे (तबला), रेणुका लिखिते (बासरी) यांनी साथ केली.
यानंतर विदुषी मंजुषा कुलकर्णी-पाटील यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी राग बिहागमधील दोन बंदिशी सादर केल्या. यात तिलवाडातील ‘ए मा धन धन रे’ ही बंदिश सादर करून त्याला जोडून अध्धा तालातील ‘लट उलझी सुलझा जा बालमा’ ही सुप्रसिद्ध बंदिश ऐकविली. त्यानंतर तराणा सादर करून आपल्या सादरीकरणाची सांगता ‘रंग डारूंगी नदी के लालन पे’ या होरीने केली. पंडित रामदास पळसुले (तबला), श्रीराम हसबनीस (संवादिनी), रणंजय कुलकर्णी, अनुष्का साने, तनिष्क अरोरा (तानपुरा, सहगायन) साथ केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप सुप्रसिद्ध ध्रुपद गायक उमाकांत गुंदेचा आणि अनंत रमाकांत गुंदेच्या यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग गंगेभूषण सादर करून रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता शिवस्तुतीने केली. त्यांना अखिलेश गुंदेचा (पखवाज), रोशनी सरोदी, तनय कामत (तानपुरा) यांनी साथ केली.
अनुपम जोशी यांना पुरस्कार …
पंडित मल्हारराव कुलकर्णी स्मृती आश्वासक कलाकारासाठीच्या पहिल्या पुरस्काराने पुण्यातील सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांना गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले. सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
Comments
Post a Comment