फुलगावमध्ये शाळेच्या जागेसाठी माजी आमदार दीपक पायगुडे यांचे धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू*रस्ता प्रकल्प व अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन; प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद नसल्याचा आरोप
*फुलगावमध्ये शाळेच्या जागेसाठी माजी आमदार दीपक पायगुडे यांचे धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू*
रस्ता प्रकल्प व अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन; प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद नसल्याचा आरोप
पुणे : प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने माजी आमदार दीपक पायगुडे यांचे फुलगाव, पुणे येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या रस्त्याबाबत तसेच अतिक्रमणाबाबत धरणे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरूच आहे.
दीपक पायगुडे यांनी फुलगाव येथील शाळेच्या जागेच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने शाळेची शैक्षणिक जागा रस्ता बांधकामासाठी ताब्यात घेतल्याच्या तसेच विविध भागात अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन सुरू केले होते. दीपक पायगुडे गेल्या नऊ दिवसांपासून फुलगावमधील शाळेच्या परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते, ही जागा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी राखीव होती. मात्र, रस्ता प्रकल्पासाठी ती घेण्यात आल्याने व अतिक्रमण केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुविधांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाचा निषेध करत पायगुडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र नऊ दिवस उलटूनही प्रशासन किंवा सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, धरणे आंदोलनामुळे दीपक पायगुडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तरीदेखील सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तेथे होऊ शकते पण याच अतिक्रमण आणि बेकायदेशीर रस्त्यामुळे ते होऊ शकणार नाही, अशी भितीदेखील दीपक पायगुडे यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment