अनटोल्ड मार्चेस..’मधून लष्करी जीवनाचे वास्तव दर्शन : सुमित मलिककर्नल नंदकिशोर कुलकर्णी लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज् बिट्विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन
‘अनटोल्ड मार्चेस..’मधून लष्करी जीवनाचे वास्तव दर्शन : सुमित मलिक
कर्नल नंदकिशोर कुलकर्णी लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज् बिट्विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : कर्नल नंदकिशोर कुलकर्णी (सेवानिवृत्त) लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज् बिट्विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ हे पुस्तक म्हणजे केवळ कथासंग्रह नसून अनुभवी सैनिकाच्या नजरेतून मांडले गेलेले लष्करी जीवनाचे वास्तव आणि जगाच्या प्रवासातील अनुभवांचे मनमोहक वर्णन आहे, असे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी सुमित मलिक यांनी केले.
कर्नल नंदकिशोर कुलकर्णी (सेवानिवृत्त) लिखित ‘अनटोल्ड मार्चेस : जर्नीज् बिट्विन सर्व्हिस ॲण्ड सेल्फ’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी मलिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पूना क्लब, कॅम्प येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ब्रिगेडिअर व्ही. पी. सिंग (निवृत्त), कर्नल डॉ. विक्रांत श्रीवास्तव (निवृत्त), प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर मंचावर होते.
हे पुस्तक आत्मस्तुतीपर नसल्याचे सांगून सुमित मलिक म्हणाले, या पुस्तकामधील कथांमधून मानवी स्वभावाच्या विविध छटांचे प्रतिबिंब दिसून येते. लेखकाची सूक्ष्म निरिक्षणशक्ती, सैनिकाचा कणखर बाणा, आयुष्यातील अनेक प्रसंग, मानवी आयुष्यातील बंध तसेच व्हिएतनामच्या गजबजलेल्या शहारांपासून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पापर्यंतचे प्रवासवर्णन अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
लेखनप्रवासाविषयी बोलताना कर्नल नंदकिशोर कुलकर्णी म्हणाले, सुमित मलिक यांच्या प्रेरणेतून माझ्या लिखाणाला कथांचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. हे पुस्तक वाचनीय करण्यासाठी अनेकांचे सहाकार्य लाभले आहे. सैन्यदलात कार्यरत असताना आलेले अनेक अनुभव तसेच केलेल्या प्रवासातील नोंदी-निरिक्षणांचा खजिना या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडला आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा निधी अनिश जाधव मेमोरिअल फाऊंडेशनच्या कार्यासाठी दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्ही. पी. सिंग आणि विक्रांत श्रीवास्तव यांनी मनोगत व्यक्त केले. व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यामतून एका योद्ध्याची कथाच नव्हे तर त्याचे अनुभव, विश्वास, आयुष्यातील अनेक प्रसंग यांचा पट उलगडला आहे.
सुरुवातीस डॉ. गीतांजली सिंग व नुपूर कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कर्नल नंदकिशोर कुलकर्णी यांच्या कार्याविषयी माहिती देणारा दृकश्राव्य माहितीपट दाखविण्यात आला. अनिल जाधव मेमोरियल फाऊंडेशनच्या कार्याविषयी ब्रिगेडिअर किशोर जाधव (निवृत्त) यांनी अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिनाक्षी कुलकर्णी यांनी केले.
Comments
Post a Comment