सई परांजपे यांच्या बालनाट्यातील ‘सिंड्रेला’ आणि ‘राणी’ने साधला बालकलाकारांशी संवाद
सई परांजपे यांच्या बालनाट्यातील ‘सिंड्रेला’ आणि ‘राणी’ने साधला बालकलाकारांशी संवाद
संवाद पुणेतर्फे सई परांजपे यांच्या सहा बालनाट्यांच्या महोत्सवाचे आयोजन
अंजली फडके-जोशी व संध्या देवरुखकर यांच्या हस्ते संहिता पूजन
पुणे : ज्येष्ठ लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे लिखित ‘झाली काय गंमत’ या नाटुकलीतील ‘सिंड्रेला’ आणि ‘शेपटीचा शाप’मधील ‘राणी’ने आज बालकलाकारांशी संवाद साधला.
निमित्त होते सई परांजपे यांनी लिहिलेल्या सहा बालनाट्यांच्या संहितापूजनाचे. संवाद पुणेतर्फे सई परांजपे यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त सहा बालनाट्यांचा महोत्सव एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आला असून महोत्सवास सादर होणाऱ्या बालनाट्यांच्या संहितांचे पूजन परांजपे यांच्या बालनाट्यात ६० वर्षांपूर्वी भूमिका केलेल्या अंजली फडके-जोशी व संध्या देवरुखकर यांच्या हस्ते झाले. जोशी यांनी ‘सिंड्रेला’ची तर देवरुखकर यांनी ‘राणी’ची भूमिका साकारली होती. या वेळी ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, दिग्दर्शक देवेंद्र भिडे मंचावर होते.
संवाद, पुणेची निर्मिती असलेल्या बालनाट्य महोत्सवात ‘शेपटीचा शाप’ (नाटकाची शाळा), ‘झाली काय गंमत’ (सृजन पुणे), ‘पक्ष्यांचे कवी संमेलन’ (स्वच्छंद), ‘सळो की पळो’ (सरहद), ‘जादूचा शंख’ (कथाकट्टा, पुणे) आणि ‘पत्ते नगरीत’ (सरहद) ही बालनाट्ये सादर होणार आहे. या बालनाट्यांच्या संहितांचे पूजन आज (दि. २२) करण्यात आले. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा बालनाट्यांच्या पोस्टरचे अनावरण या प्रसंगी मान्यवर, नाट्य दिग्दर्शक तसेच बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी महोत्सवाविषयी माहिती देताना सांगितले की, पुण्यातील बालनाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या पाच संस्थांच्या सहकार्याने पुणे व उपनगर परिसरात बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दि. १८ एप्रिल रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सकस व दर्जेदार बालनाट्ये रसिक, बालकलाकारांपर्यंत पोहोचावीत आणि ज्येष्ठ लेखिका सई परांजपे यांना मानाचा मुजरा केला जावा या उद्देशाने महोत्सव भरविण्यात येत आहे.
साठ वर्षांपूर्वी बालनाट्यात केलेल्या भूमिकांच्या आठवणी उलगडताना गीतांजली फडके-जोशी म्हणाल्या, बालोद्यानमध्ये सहभागी असताना सईताईंशी परिचय झाला. त्यातूनच त्यांच्या बालनाट्यात भूमिका साकारण्यास सुरुवात केली. नाट्यक्षेत्रात मी केलेल्या कार्याचे संपूर्ण श्रेय सई परांजपे यांना जाते.
संध्या देवरुखकर म्हणाल्या, बालनाट्य क्षेत्रात सई परांजपे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक या महोत्सवानिमित्त होणार आहे. परांजपे यांच्याबरोबर केलेल्या बालनाट्यांमधून आम्ही बाल कलाकार घडलो. मराठी भाषेवर व बालकांवर प्रेम करणाऱ्या या संस्थांचे कौतुक असून साठ वर्षे झाली तरी सईताईंची ही बालनाट्ये आजही मनोरंजन करीत मराठी भाषेचे उत्तम संस्कार घडवित आहेत.
राजीव तांबे यांनी आठवणींना उजाळा देताना सई परांजपे यांच्या ‘जादूचा शंख’ या बालनाट्याने प्रभावित झालो होतो, असे सांगून सई परांजपे यांनी लिहिलेली बालनाट्ये आनंददायी आहेत. त्यांची बालनाट्ये पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे असे सांगितले.
देवेंद्र भिडे यांनी बालनाट्य महोत्सवाची संकल्पना विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्रणी साठे हिने केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले.
Comments
Post a Comment