दगडूशेठ' संगीत महोत्सवाच्या ४२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा*पं. हृदयनाथ मंगेशकर यांची ‘भावसरगम’मध्ये उपस्थिती ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे संगीत महोत्सव सांगता
*'दगडूशेठ' संगीत महोत्सवाच्या ४२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा*
पं. हृदयनाथ मंगेशकर यांची ‘भावसरगम’मध्ये उपस्थिती ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे संगीत महोत्सव सांगता
पुणे : 'बरोबर ४२ वर्षांपूर्वी याच कार्यक्रमात मी गाण्यासाठी बसलो होतो. काका गोडसे यांनी माझा पहिला कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी फक्त एक तबलावादक आणि मी असेच सादरीकरण असायचे. कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होऊन पहाटे चार-पाच वाजेपर्यंत रंगायचा. आज मी प्रकृतीने खूप अस्वस्थ आहे; मात्र 'दगडूशेठ' गणपतीचा कार्यक्रम असल्यामुळेच मी येथे आलो आहे, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी अजरामर केलेले ‘श्री रामचंद्र कृपालु भज मन’ हे स्तवन गायिका प्राची यांनी सादर केले. त्यानंतर विभावरी आपटे-जोशी यांनी ‘गजानना श्री गणराया आधी बंधू तुज मोरया’ तसेच विनायक दामोदर सावरकर रचित ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘गेले द्यायचे राहून’ हे गीत ऋतुजा तारे यांनी सादर केले, तर संत ज्ञानेश्वरांच्या रचनेवर आधारित ‘मोगरा फुलला’ हे गीत विभावरी आपटे-जोशी यांनी सुरेल आवाजात सादर केले. ‘रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा’, ‘ही वाट दूर जाते’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी’ ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांनी अजरामर केलेली गीते कलाकारांनी सादर केली. टाळ्यांच्या कडकडाटात पुणेकरांनी गायक व वादकांना उत्स्फूर्त दाद दिली.
पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाचा तारपा वादन व नृत्याचा कार्यक्रम, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके व सहका-यांचा फिटे अंधाराचे जाळे, पं.उपेंद्र भट आणि सहका-यांचा गुरु गणेश हा सांगीतिक कार्यक्रम, नंदेश उमप आणि ७५ कलाकारांचे सादरीकरण असलेला मी मराठी हा कार्यक्रम, खंडेराव मुळे आणि सहका-यांचा स्वरयात्रा, कुणाला गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्ट, नटरंग अॅकॅडमी तर्फे त्रिपुंड, माणिक वर्मा फाऊंडेशन निर्मित अमृताहुनी गोड, स्वरप्रज्ञा कार्यक्रमात पं. मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर यांची व्हायोलिन जुगलबंदी आणि पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांची भावसरगम ही स्वरमैफल सादर झाली. अधिश पायगुडे यांनी सर्व कार्यक्रमांचे सुरुवातीचे निवेदन केले.
Comments
Post a Comment