पुणे विमानतळ देशात अव्वल प्रवासी समाधान आणि सेवा गुणवत्तेत पटकावला प्रथम क्रमांक

पुणे विमानतळ देशात अव्वल 

प्रवासी समाधान आणि सेवा गुणवत्तेत पटकावला प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे. 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. 

देशातील सर्व विमानतळांवर 'एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५' (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.'

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य