गायनातील सुवर्णमध्य साधण्याची कला किशोरीताईंमुळे अवगत : पंडित अरुण द्रविडगायनातून नवीन विचार मांडण्याची किशोरीताईंची शिकवण : पंडित अरुण द्रविडऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘परंपरा’ मालिकेत सांगीतिक संवाद
गायनातील सुवर्णमध्य साधण्याची कला किशोरीताईंमुळे अवगत : पंडित अरुण द्रविड
गायनातून नवीन विचार मांडण्याची किशोरीताईंची शिकवण : पंडित अरुण द्रविड
ऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘परंपरा’ मालिकेत सांगीतिक संवाद
पुणे : सुरांना पारिजातकाच्या फुलांप्रमाणे समजून त्यांना नजाकतीने कुरवाळणे आवश्यक असते. गाताना फक्त व्याकरणावर भर न देता त्यातील सौंदर्यविचार, भावसौंदर्य समजून-उमजून गावे. सर्व घराण्यांचे संगीत ऐकून ते आत्मसात करत आपल्या गायनातून नवीन विचार मांडणे आवश्यक आहे, असे गानसरस्वती किशोरी अमोणकर आम्हा शिष्यांना सांगत असत, असे जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि किशोरीताईंचे ज्येष्ठ शिष्य पंडित अरुण द्रविड यांनी सांगितले.
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे ‘परंपरा’ या मालिकेअंतर्गत शनिवारी सांगीतिक मैफल व संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पंडित अरुण द्रविड यांनी सांगीतिक प्रवास उलगडला. त्यांच्याशी किशोरीताईंचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांनी संवाद साधला.
जयपूर घराण्याच्या गायकीचा पाया भक्कम करण्यात मजीद खाँसाहेब यांचा मोठा वाटा होता. त्यांनी जयपूर घराण्यातील तानांमधील गमक, बलस्थाने, आकार लावण्याची तालीम दिली, असे सांगून पंडित अरुण द्रविड पुढे म्हणाले, किशोरीताईंसह त्यांच्या गुरू व आई मोगुबाई कुर्डिकर यांचे देखील मला मार्गदर्शन लाभले. जयपूर घराण्यातील शिस्तबद्ध रागस्वरूप सांभाळत, व्याकरणाचा सखोल अभ्यास करत गायकीतील सौंदर्यविचार, कलाकुसर दाखविणे ही सुवर्णमध्य साधण्याची कला किशोरीताईंमुळे माझ्या गायनात आली.
मोगुबाई कुर्डिकर यांची तालीम किशोरीताईंच्या गाण्यात दिसते त्याचबरोबर किशोरीताईंच्या अंर्तमनातील विचार, भावनात्मकता आणि उत्कटता प्रकर्षाने जाणवते. किशोरीताईंचे माझ्या जीवनातील स्थान सर्वात वरचे असून पुन्हा जन्म मिळाल्यास मोगुबाईंसह किशोरीताईंकडे शिष्य म्हणून सांगीतिक तालीम घेण्याची इच्छा असल्याचे पंडित द्रविड म्हणाले.
आजचे गायक किशोरीताईंच्या गाण्यांची रेकॉर्ड ऐकून त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात; परंतु गाणे हे गुरूमुखीच शिकायचे असते. त्याशिवाय गाण्यात स्वत:ची प्रगल्भता, आविष्कार उमटत नाहीत.
सांगीतिक संवादानंतर पंडित अरुण द्रविड यांची गायन मैफल रंगली. त्यांनी जयपूर घराण्यातील रायसा कानडा हा वैशिष्ट्यपूर्ण राग सादर करून अल्लादिया खाँसाहेब यांची बंदिश ऐकविली.
पहिल्या सत्रात जयपूर-अत्रौली घराण्याच्या जुई धायगुडे-पांडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी श्री राग उलगडून दाखविताना परात्पर गुरू गानसरस्वती किशोरी अमोणकर यांची बंदिश सादर करून द्रुत लयीत बलवंतराय भट यांची रचना ऐकविली. खेमकल्याण राग सादर करताना अल्लादिया खाँसाहेबांची बंदिश सादर करून मध्यलय तीन तालात किशोरीताईंची बंदिश ऐकविली. त्यानंतर गुरू पंडित अरुण द्रविड रचित खेमकल्याणमदील तराणा सादर करून मैफलीची सांगता केली.
कलाकारांना ऋषिकेश जगताप (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), सूर गोखले, सचिन शशितळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सन्मान ऋत्विक फाऊंडेशनचे संस्थापक प्रविण कडले आणि चेतना कडले यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले.
Comments
Post a Comment