तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायन*श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष


*तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायन*
श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : “दशरथ हा घे हे पायच दान...”, “मन हो राम रंगी रंगले...”, “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...”, “आगा वैकुंठीच्या राया...”, “पंढरी निवास सखा पांडुरंगा...” अशा भक्तिगीतांनी तुळशीबाग राम मंदिर परिसरात भक्तिरसाची अविस्मरणीय मैफल रंगली. प्रख्यात गायक पंडित आनंद भाटे यांनी सादर केलेल्या भावमधुर गायनाने उपस्थित भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त तुळशीबाग राम मंदिर येथे आनंद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उत्सवाचे अखंडित २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात राग यमन कल्याणने करून काही भक्तिरचना आनंद भाटे यांनी सादर केल्या. “पंढरी निवासा सखा पांडुरंगा...” या भक्तीगीतानंतर अतिशय दुर्मिळ गायली जाणारी प्रभू रामचंद्रांना समर्पित ‘रघुराजा हा माझा विसावा’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी सांगितले की, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली या भव्य मंदिराची स्थापना केली. यंदा २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा तसेच श्रीरामराज्याभिषेक सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच रामायण वाचन, प्रवचन आणि संगीत कार्यक्रम अशा सांस्कृतिक उपक्रमांचाही समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य