कवयित्री, लेखिका नूतन शेटे यांच्या काव्य आणि ललितलेख संग्रहाचे प्रकाशन
कवयित्री, लेखिका नूतन शेटे यांच्या काव्य आणि ललितलेख संग्रहाचे प्रकाशन
पुणे : कवयित्री, लेखिका नूतन शेटे यांची लेखनातील वाचनीयता विशेष उल्लेखनीय असून त्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास लेखनातून प्रतिबिंबित होताना दिसतो. त्यांचे संवेदन आजच्या भोवतालातील वैचारिक गोंधळ, अशांतता आणि कोलाहलात स्वतःमधील शांततेकडे नेते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी केले.
प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व समुपदेशक नूतन योगेश शेटे यांच्या ‘नित्यनूतन’ या कवितासंग्रहाचे तसेच ‘कॉफी विथ नूतन’ या ललितलेखसंग्रहाच्या प्रकाशन आज (दि. २१) झाले. त्या वेळी डॉ. संगीता बर्वे अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रसिद्ध गजलकार, लेखक भूषण कटककर, लेखिका नीलिमा बोरवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कवयित्री योगिनी जोशी, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या ज्योत्स्ना चांदगुडे, योगेश शेटे उपस्थित होते. स्वयं प्रकाशनातर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. कर्वे रस्त्यावरील एनएनडीटी महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लेखनाविषयी नूतन शेटे म्हणाल्या, कवितेने मला जाणिवा, संवेदनांचे आभाळ दिले. त्यातूनच मुक्तछंद ते वृत्तबद्ध कवितांचा प्रवास शक्य झाला. माझ्या कुटुंबियांनी, स्नेही परिवारानेही माझी कविता सांभाळली. समुपदेशक म्हणून काम करताना संवेदना, सहसंवेदना, स्वीकार यांतून कवितांसह, ललितलेखनही घडले. दोन्ही पुस्तके ही सकारात्मकता आहे.
भूषण कटककर म्हणाले, कवयित्री नूतन शेटे यांच्या अभिव्यक्तीत विषय, आशय, शैलीचे वैविध्य असून, त्यांचा नित्यनूतन हा संग्रह म्हणजे वृत्तबद्ध कवितांचा खजिना आहे. नाविन्यासह कल्पकता हेही त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. मराठी कवितेला एक पाऊल पुढे नेणारी त्यांची अभिव्यक्ती आहे.
नीलिमा बोरवणकर म्हणाल्या, कविता आणि ललितलेख या घाटांतून नूतन यांचे लेखन तरलता आणि भावात्म शैली घेऊन प्रकट झाले आहे. भोवतालाकडे, घटना-प्रसंगांकडे, व्यक्तींकडे नूतन स्वतःच्या खास नजरेने बघतात. त्यांच्यातील समुपदेशकाची दृष्टी सदैव जागी असते. त्यातून प्रकट होणाऱ्या लेखन, कवितेतून नूतन या वाचकांशी थेट बांधल्या जातात.
नूतन शेटे यांच्या ‘कॉपी विथ नूतन’ या संग्रहातील लेखाचे अभिवाचन आरती देवगावकर यांनी केले. प्रकाशनानंतर नूतन यांच्या कवितांचे सादरीकरण कविता क्षीरसागर, चंचल काळे, डॉ. वैशाली मोहिते, मिलिंद जोशी, नूतन शेटे यांनी केले. मिहिका शेटे यांनी ऑनलाईन स्वरूपात अमेरिकेतून मनोगत मांडले. स्वाती यादव आणि आरती देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment