भक्ती धावले ठरली देशभक्त 'केशवराव जेधे करंडका'ची मानकरीश्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित चौथी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
भक्ती धावले ठरली देशभक्त 'केशवराव जेधे करंडका'ची मानकरी
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित चौथी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची भक्ती धावले ही देशभक्त केशवराव जेधे करंडकाची मानकरी ठरली. संताजी महाविद्यालय येथील अनिकेत वनारे याने द्वितीय तर मुंबई विद्यापीठचा यश पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष होते.
स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतील तत्त्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. हरीश नवले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सहसचिव विकास गोगावले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते झाले. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा झाली. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन, खजिनदार जगदीश जेधे, सुनील जगताप, बाळासाहेब गायकवाड, तानाजी घारे, संग्राम कोंडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ. दिपाली आर. पाटील, संयोजक समिती सदस्य डॉ. अमित गोगावले आणि संयोजक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
विजय कोलते म्हणाले, तुमच्या मनातील विचार नेमक्या शब्दात सांगता येणे ही कला जमली पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता विकसित करण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात करायचे असते. बोलणे ही खूप मोठी कला आहे. शिक्षकांनी देखील पुस्तक यातील अभ्यासाव्यतिरिक्त चरित्रगाथा सांगितल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी उत्तम व्यक्त होऊन बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा.डॉ. हरीश नवले यांनी वक्तृत्व कलेचा इतिहास सांगितला आणि सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांचे संवाद या विषयावर सविस्तर भाष्य केले. वक्त्याच्या अंगी आचरण विषयक नितीशास्त्र, भावनात्मक आवाहन करण्याची क्षमता आणि तर्कसंगत युक्तिवाद करण्याचे गुण असणे आवश्यक आहे असे सांगून वक्तृत्वाकडे समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. विकास गोगावले यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यामध्ये अभय आळशी, मुंबई विद्यापीठ मुंबई. नितीन गागरे, संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पुणे, प्रणव मोहोकार, सीओइपी पुणे, अनुष्का चौधरी, एआयएसएसएमएस आणि तनिष्का जाधव सीओईपी पुणे हे उत्तेजनार्थ विजेते ठरले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. योगेश बोराटे (वृत्त व संज्ञापन विभाग रानडे इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे), प्रा.डॉ. पांडुरंग कंद (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) आणि प्रा. स्वामीराज भिसे (टी.जे महाविद्यालय, खडकी) यांनी केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रु., द्वितीय क्रमांकाला ७,७७७ रु., तृतीय क्रमांकाला ५,५५५ रु. आणि उत्तेजनार्थ क्रमांकाला १,१११ रु. रोख आणि स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे डॉ. दिपाली आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. विशाल गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा.डॉ. दीपक सुरवसे यांनी आभार मानले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संतोष यादव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रजनी जरांडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा. शितल वाघमारे यांनी केले.
Comments
Post a Comment