सीडीएसएलतर्फे ‘रिइमॅजिन: सिक्युरिटीज मार्केट थ्रू डेटा सिनर्जी’ या तिसऱ्या वार्षिक परिसंवादाचे आयोजन
सीडीएसएलतर्फे ‘रिइमॅजिन: सिक्युरिटीज मार्केट थ्रू डेटा सिनर्जी’ या तिसऱ्या वार्षिक परिसंवादाचे आयोजन
· परिसंवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेबी अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे
· पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या सीडीएसएल रिइमॅजिन आयडियाथॉनसाठी पाच संघांना एकूण 12 लाख रु.ची पारितोषिके
· परिसंवादात पहिल्यांदाच एआय (AI) आधारित पॅनेलिस्टचा सहभाग
· आकर्षक कथाकथनाच्या माध्यमातून माहितीपूर्ण सजग गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सेबी अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे यांच्याकडून सीडीएसएल आयपीएफच्या अमर चित्र कथा कॉमिक मालिकेचे प्रकाशन
मुंबई, 10 फेब्रुवारी 2026: आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी आणि 17.5 कोटीहून अधिक डीमॅट खात्यांचे विश्वासार्ह संरक्षक सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने मुंबई येथे “रिइमॅजिन: सिक्युरिटीज मार्केट थ्रू डेटा सिनर्जी” या विषयावर आपल्या तिसऱ्या वार्षिक परिसंवादाचे आयोजन केले. या परिसंवादात धोरणकर्ते, नियामक, आघाडीच्या मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स (MIIs), मध्यस्थ, उद्योग क्षेत्रातील नेते तसेच तंत्रज्ञान नवनिर्माते एकत्र आले आणि भविष्यासाठी सज्ज सिक्युरिटीज मार्केट घडविण्यात डेटाची भूमिका यावर विचारमंथन करण्यात आले. रिइमॅजिन व्यासपीठाचा एक भाग म्हणून, सीडीएसएलने रिइमॅजिन आयडियाथॉन 2026 या पहिल्या स्पर्धेचे विजेतेही जाहीर केले. विकसित भारतासाठी गुंतवणूकदार शिक्षणाची नव्याने मांडणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करणारी ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होती.
रिइमॅजिन परिसंवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे श्री तुहिन कांता पांडे होते. यावेळी सेबीचे पूर्णवेळ सदस्य श्री. संदीप प्रधान, तसेच एचडीएफसीचे माजी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री केकी मिस्त्री सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय, सिक्युरिटीज मार्केट परिसंस्थेतील विविध क्षेत्रांमधील नामवंत वक्ते आणि पॅनेलिस्ट्स यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी बोलताना सेबी अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे म्हणाले, “गेली अनेक दशके जेव्हा आपण बाजार पायाभूत सुविधांबद्दल बोलत होतो, तेव्हा त्यात एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, डिपॉझिटरीज इत्यादी गोष्टींचा समावेश असायचा. आज मात्र त्याइतकीच महत्त्वाची, पण बहुतेक वेळा दिसून न येणारी आणखी एक पायाभूत सुविधा आहे; ती म्हणजे डेटा. डेटा म्हणजे भांडवली बाजारातील नवीन प्लंबिंग आहे: न दिसणारे पण अपरिहार्य आणि सामर्थ्यवान साधन. या जगात डेटाची गुणवत्ता, त्याभोवतीची सुरक्षा आणि त्याच्या वापराला दिशा देणारी प्रशासन चौकट हे भांडवल आणि तरलतेइतकेच महत्त्वाचे ठरतात. रिइमॅजिन आयडियाथॉन चॅलेंजचे आयोजन केल्याबद्दल मी सीडीएसएलचे कौतुक करतो. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना आमच्या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.”
या परिसंवादात तीन विषयाधारित पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा-आधारित नाविन्यपूर्णता, बाजारवाढीसाठी विश्वास हा मूलाधार, नियामक चौकटी, सायबरसुरक्षा सज्जता तसेच डेटा-केंद्रित सिक्युरिटीज मार्केट परिसंस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले संघटनात्मक आणि सांस्कृतिक बदल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
परिसंवादाची पार्श्वभूमी मांडताना सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेहल व्होरा म्हणाले, “रिइमॅजिन परिसंवादातून सिक्युरिटीज मार्केट परिसंस्थेतील विविध घटकांमध्ये सहयोगात्मक संवादाला प्रोत्साहन देण्याबाबत असलेली सीडीएसएलची बांधिलकी दिसून येते. बाजार डिजिटल वातावरणात अधिकाधिक विकसित होत असताना, डेटाचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे उपयोग करणे हे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि सर्वसमावेशक तसेच सक्षम सिक्युरिटीज मार्केट उभारण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.”
सेबीचे पूर्णवेळ सदस्य श्री. संदीप प्रधान म्हणाले, “भारताचे सिक्युरिटीज मार्केट अधिक खोल आणि व्यापक होत असताना डेटा-आधारित माहिती आणि गुंतवणूकदार शिक्षणाची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे. गुंतवणूकदार जागरूकता मजबूत करणे आणि जबाबदार सहभागाला प्रोत्साहन देणे हे बाजाराची अखंडता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे. रिइमॅजिन सारखी व्यासपीठे नाविन्यपूर्णतेला चालना देतानाच या मूलभूत उद्दिष्टांना बळकटी देत एक मौल्यवान मंच पुरवितात.”एचडीएफसीचे माजी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच रिइमॅजिन आयडियाथॉन ज्यूरी अध्यक्ष श्री. केकी मिस्त्री म्हणाले, “डेटा आणि तंत्रज्ञान हे बाजार पायाभूत सुविधांचे केंद्रबिंदू ठरत असताना, रिइमॅजिन परिसंवादासारखी व्यासपीठे भारताच्या सिक्युरिटीज मार्केटच्या भविष्यासंदर्भातील चर्चेला आकार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आयडियाथॉनने विद्यार्थ्यांना या चर्चेत सहभागी करून घेत एक नवे आणि ताजेतवाने परिमाण जोडले, तसेच व्यावहारिक आणि अंमलात आणता येण्याजोग्या कल्पनांना प्रोत्साहन दिले. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढीतील बाजार नवनिर्माते आणि सुजाण बाजार सहभागींना घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल.”
सीडीएसएल अध्यक्ष आणि सार्वजनिक हित संचालक श्री. गुरुमूर्ती महालिंगम म्हणाले, “भारताचा भांडवली बाजार अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे डेटा, तंत्रज्ञान आणि प्रशासन परस्पर सुसंगतपणे पुढे जाणे आवश्यक आहे. देशांतर्गत बचतींना उत्पादनक्षम, बाजाराशी संलग्न मालमत्तांकडे वळविताना, मजबूत डेटा गव्हर्नन्स आणि गुंतवणूकदार संरक्षण सुनिश्चित करणे हे भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी निधी उभारण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. रिइमॅजिन व्यासपीठ हे संस्था, मध्यस्थ आणि नियामकांमधील या सामायिक जबाबदारीचे प्रतिबिंब आहे.”
रिइमॅजिन आयडियाथॉन 2026 चे विजेते
या परिसंवादातील एक महत्त्वाचा आकर्षणाचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या रिइमॅजिन आयडियाथॉन 2026 या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान. विकसित भारतासाठी गुंतवणूकदार शिक्षणाची नव्याने मांडणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करणारी ही स्पर्धा होती. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील प्रोजेक्ट सहायक या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आणि एकूण 12 लाख रु. च्या पारितोषिक निधीतून 5 लाख रु. चे बक्षीस मिळवले. लखनऊ येथील श्री रामस्वरूप मेमोरियल कॉलेजचा प्रोजेक्ट खेत निवेश आणि बंगळुरू येथील बीएनएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा प्रोजेक्ट नीवी यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेतेपद पटकावले आणि त्यांना अनुक्रमे 3 लाख रु. आणि 2 लाख रु. ची पारितोषिके देण्यात आली. या आयडियाथॉन साठी 21 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील संस्थांकडून 1,000 हून अधिक नोंदणी झाली होती.
परिसंवादातील एआय-आधारित पॅनेलिस्ट
पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत, परिसंवादात एआय-आधारित पॅनेलिस्टने उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत सहभाग घेतला आणि महत्त्वाच्या विषयांवर रिअल-टाइम, डेटा-आधारित माहिती सादर केली. यामुळे बाजार बुद्धिमत्ता-कौशल्य आणि निर्णय-प्रक्रिया चौकट मजबूत करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका अधोरेखित झाली.
सीडीएसएल आयपीएफच्या अमर चित्र कथा गुंतवणूकदार शिक्षण कॉमिक मालिकेचे प्रकाशन
सीडीएसएलच्या व्यापक गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून सेबी अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे यांनी परिसंवादात सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडच्या अमर चित्र कथा कॉमिक मालिकेचे 12 भाषांमध्ये प्रकाशन केले. ही मालिका गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पनांना आकर्षक, गोष्टीरूपात सादर करून माहितीपूर्ण, सजग गुंतवणुकीला चालना देते.
रिइमॅजिन परिसंवादासारख्या व्यासपीठांद्वारे, सीडीएसएल नाविन्यपूर्णता, गुंतवणूकदार शिक्षण आणि परिसंस्था सहकार्याला प्रोत्साहन देण्याबाबत आपली वचनबद्धता अधिक मजबूत करत आहे. डेटा-आधारित आणि विश्वास-केंद्रित बाजार वातावरण निर्माण करून, भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज सिक्युरिटीज मार्केट उभारण्याच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत योगदान देण्याचा सीडीएसएलचा उद्देश आहे.
Comments
Post a Comment