आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञानाचा वापरही वारसा जतन-संवर्धनात करावा‌‘बीएनसीए‌’तर्फे मानवी बांधकामावरील चौथ्या राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे प्रतिपादन

आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञानाचा वापरही वारसा जतन-संवर्धनात करावा
‌‘बीएनसीए‌’तर्फे मानवी बांधकामावरील चौथ्या राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे प्रतिपादन

पुणे, दि. ६ फेब्रुवारी २०२६ : आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञानाचा वापरही वारसा जतन-संवर्धनात करावा, तरच भविष्यात आपल्या परंपरा पुढील पिढ्यांपुढे शाश्वत स्वरूपात नेऊ शकू. आजच्या कृत्रिम बुद्धीमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक ज्ञान असणारे कुशल कारागीरही या जतन-संवर्धनासाठी उपयोगात आणले पाहिजेत, असे स्पष्ट प्रतिपादन ‌‘मानवी बांधकाम पर्यावरण आणि त्यापलीकडील पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत भविष्य‌’ (बिल्ट एनव्हायरमेंट ॲण्ड बियाँड 4.0: फ्रॉम ट्रॅडिशनल विज्डम टू रेझिलियंट फ्यूचर) या मालिकेतील दोन दिवसांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेतील तज्ज्ञांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन तर्फे (बीएनसीए) आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या पूरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आपत्ती जोखिम व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. रोहित जिग्यासू यांनी बीजभाषणे केली. या परिषदेच्या आयोजनात कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर (आयआयए) आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर (आयआयए) पुणे विभाग, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेजच्या (आयएनटीईसीएच) पुणे विभागाचा सहभाग होता. या परिषदेत ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, परिषदेच्या संयोजक डॉ. संजीवनी पेंडसे, सह-संयोजक डॉ. प्राजक्ता दलाल-कुलकर्णी, समन्वयक प्रा. सायली कुलकर्णी असून आयोजन समितीमध्ये डॉ. स्वाती सहस्रबुद्धे आणि डॉ. मीरा शिरोळकर यावेळी उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. कश्यप यांनी सांगितले की, परिषदेत पीएचडी झालेले आपल्या देशातील व विविध क्षेत्रातील 32 समीक्षकांनी शोध निबंधांची समीक्षा केली. डॉ. धोंगडे यांनी देशातील ऐतिहासिक वारशाची वैभवशाली परंपरा व उज्वल भविष्यासाठी करावे लागणारे जतन-संवर्धन पाहता या परिषदेचे औचित्य विषद केले.

डॉ. पेंडसे म्हणाल्या की, या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी एकंदर 135 अभ्यासकांचे शोध निबंधांपैकी 50 शोधनिबंध परिषदेतील सादरीकरणासाठी निवडण्यात आले.

आपल्या बीजभाषणात डॉ. गर्गे म्हणाले की, मानवी बांधकामाचे प्राचीन व आर्वाचिन महत्त्व लक्षात घेता राज्यातील निवडक 386 वारसा स्थळांच्या जतन-संवर्धनाच्या कामात किल्ले, राजवाडे, मंदिरे, वाडे, गुंफा, लेणी, पाणवठे यांचा समावेश असून त्यांच्या समग्र नियोजनाचे काम चालू आहे. सुरुवातीला या कामात काही तृटी राहिल्या व त्यावर टीकाही झाली असली तरीही आता आम्ही नवे तंत्रज्ञान व पांरंपारिक कारागीरांच्या मदतीने अत्यंत अवघड व जिकिरीच्या जतन-संवर्धनात समाधानकारक यशही मिळवले आहे.

डॉ. जिग्यासू यांनी त्यांच्या विवेचनात जगभरात होणारे भूकंप, महापूर, त्सुनामी, वणवे अशा नैसर्गिक आपत्तींचा परामर्श घेताना म्हणाले की, या आपत्तींमध्ये आधुनिक बांधकामांपेक्षा पारंपरिक बांधकामेच अधिक प्रमाणात टिकून राहिली आहेत. कारण त्यामध्ये स्थानिक भौगोलिक रचना तत्व आणि हवामान विचार केला. जपानसारख्या भूकंपप्रवण देशातील ग्रामीण भागातील घरे ही प्रामुख्याने जंगलातील लाकूडासारख्या साहित्याचा वापर करून बांधलेली आहेत. आसाम, नेपाळ व गुजराथ येथील आपत्तींमध्ये यासारख्या भागात पारंपरिक विचारातून बांबूंचा वापर घर बांधणीत आणि आपत्ती नियोजनासाठी करण्यात आला आहे.

पारंपरिक ज्ञानाच्या वापरातूनच बांधकामाच्या शाश्वततेसाठी निसर्गपूरक मार्ग काढले जात असल्याचे डॉ. जिग्यासू यांनी सांगितले. ते म्हणाले की, अशा वेळी पारंपरिक कौशल्य असणारे कारागीरच उपयोगी ठरतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे दगड, तयार केलेल्या विटा आणि उपलब्ध लाकडाचा वापर भूकंप व पूर प्रतिबंधक म्हणून विचारपूर्वक केलेला आढळतो. यातून आपल्या पारंपरिक बलुतेदारांचे महत्त्व न नाकारता त्यांच्याकडील ज्ञान व कौशल्याचा आदर राखत त्याला प्रतिष्ठा द्यायला हवी. तसेच पारंपरिक दगडकाम, वीटकाम, लोहारकाम, धातूकाम करणाऱ्या कारागिरांचे जाणीवपूर्वक पुनर्वसन करताना त्यांना आजच्या आधुनिक बांधकामातही सन्मानाने स्थान दिले पाहिजे.

दोन दिवसांच्या या परिषदेत पारंपरिक ज्ञान व प्रचलित कार्यपद्धती यावर अम्यासकांनी शोधनिबंध सादर केले. त्यामध्ये पारंपरिक ज्ञान व त्यावर आधारित केलेले पर्यावरणपूरक बांधकाम याबाबतच्या विवेचनात परंपरांचा समावेश हा समकालीन सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित होता. त्याच्या प्रभावातून तत्कालीन बांधकामांचे नियोजन आणि रचनात्मकता घडत गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये वास्तूरचनांचा प्रचलित वापर, त्यातील अवकाशरचना, पाणी साठवण्याच्या पद्धती हा त्याचा जिवंत वारसा कसा बनला याचे सादरीकरण परिषदेत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य