आय.सी. कॉलनीतील वाहतूक कोंडी गंभीर; शाळा, चर्च व बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

*आय.सी. कॉलनीतील वाहतूक कोंडी गंभीर; शाळा, चर्च व बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिक त्रस्त*

मुंबई | प्रतिनिधी

बोरिवली पश्चिमेतील आय.सी. कॉलनी व परिसरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शाळा, चर्च परिसरातील अनियंत्रित वाहतूक, ऑटो रिक्षांचे बेकायदेशीर पार्किंग, दुहेरी पार्किंग आणि फूटपाथवर उभी असलेली सोडून दिलेली वाहने यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कायद्याचा स्पष्ट आधार देत लेखी तक्रार करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

आय.सी. कॉलनीतील रहिवासी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ता धनंजय जुन्नरकर यांनी २४ जानेवारी रोजी बोरिवली वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात मोटार वाहन कायदा, भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींचा उल्लेख करत वेळेत व प्रभावी अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे.

चर्च परिसरात रविवारी वाहतूक ठप्प

निवेदनानुसार, आय.सी. कॉलनीतील चर्च परिसरात रविवारी व सणासुदीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर व कडेला उभी राहतात. चर्चला येणाऱ्या खासगी गाड्या, टेम्पो आणि ऑटो रिक्षांमुळे मुख्य रस्ते व अंतर्गत लेनमध्ये वाहतूक ठप्प होते, अनेक वेळा इमारतींचे प्रवेशद्वार व आपत्कालीन मार्ग अडवले जातात. या काळात वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे पोलीस मनुष्यबळ व नियोजन नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

शाळांभोवती रोजची कोंडी

टी-पिया कॅफेजवळील लेनमधील सी.पी. गोएंका शाळा परिसरात शाळेच्या बस, टेम्पो, दुचाकी, ऑटो व शेअर ऑटोच्या रांगा अनेकदा इमारतींचे गेट अडवतात.

होली क्रॉस रोडवरील व्हायबग्योर शाळा येथे बस व पालकांच्या खासगी वाहनांमुळे सकाळी व दुपारी तीव्र वाहतूक कोंडी होते. शाळेने बाजूच्या लेनमधून स्वतंत्र प्रवेश व निर्गमन व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

नारायणा शाळेच्या बसांमुळेही परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे निवेदनात नमूद आहे.


ऑटो रिक्षांचा उच्छाद आणि सुरक्षेचा मुद्दा

आय.सी. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर ऑटो रिक्षांचे अनधिकृत पार्किंग नेहमीचे झाले असून, क्रॉस रोड क्रमांक ३, ४ आणि ५ येथे दुहेरी पार्किंग सर्रास सुरू आहे. मेट्रो स्थानकाजवळ उभ्या असलेल्या ऑटो रिक्षा हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर सुरक्षेचाही गंभीर प्रश्न असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फूटपाथवर वाहने, पादचाऱ्यांची कोंडी

कॉलनीत अनेक वाहने महिनोन्‌महिने तसेच उभी असून, काही दुचाकी थेट फूटपाथवर पार्क केल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. हा प्रकार सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

निवेदनात मोटार वाहन कायद्यातील कलम १२२, १७७, १८४ व २०१, तसेच भारतीय दंड संहितेतील कलम २६८ (सार्वजनिक उपद्रव) यांचा उल्लेख करत, क्लॅम्पिंग, टोईंग, ई-चलान, सीसीटीव्ही-आधारित अंमलबजावणी आणि नियमित गस्त ही ऐच्छिक नसून बंधनकारक कर्तव्ये असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

धनंजय जुन्नरकर यांनी १५ दिवसांत ठोस कारवाई व Action Taken Report देण्याची मागणी केली असून, अन्यथा पोलीस आयुक्तांकडे तक्रार आणि मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

या आरोपांबाबत बोरिवली वाहतूक पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य