शिवकथाकार विजयराव देशमुख - एका अलौकिक व्यक्तिमत्वाचे जाणे" -खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
"शिवकथाकार विजयराव देशमुख - एका अलौकिक व्यक्तिमत्वाचे जाणे" -खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
पुणें दिनांक 27 फेब्रुवारी-
45-50 वर्षांपूर्वी पुण्या मुंबई पासून दूर नागपुरात राहून छत्रपती शिवरायांची आणि जिजाऊ माँसाहेबांची जन्मतारीख व तिथी शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून आपल्या 'शककर्ते शिवराय' ह्या 1980 मधे प्रथम प्रकाशित द्विखंडात्मक शिवचरित्रातून मांडणारे शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते, त्यांच्या जाण्याने ऐतिहासिक व अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. भारत इतिहास संशोधक मंडळाने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंडळाचे कार्यवाह श्री पांडुरंग बलकवडे, दुर्गमहर्षी प्र के घाणेकर, छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री मनीष उद्धव आणि मासिक पत्रभेट च्या मुख्य संपादक सौ प्रज्ञा फडणीस व्यासपीठावर उपस्थित होत्या.
रिझर्व्ह बँकेतील नोकरी यशस्वीपणे सांभाळून थोर संशोधक साहित्यिक इतिहासकार आणि नंतर आध्यात्मिक गुरु म्हणून श्रीगुरुमंदिर परिवार उभे करणारे सद्गुरूदास विजयराव एक आगळे आणि उत्तुंग व्यक्तिमत्व होते. एकाच आयुष्यात दोन भिन्न क्षेत्रात त्यांनी केलेले डोंगराएव्हढे कार्य बघून अचंबित व्हायला होते असे दुर्गतज्ञ प्र. के. घाणेकर म्हणाले. गेल्या पन्नास वर्षांपासून आपले त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असून ते मला वडील भावाप्रमाणेच होते अशा हृद्य भावना त्यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या व्यक्तिमत्वातील निष्ठा निर्धार आणि निष्कामता हे तीन गुण सांगतांना प्रतिष्ठानचे श्री मनीष उद्धव म्हणाले की विजयरावांनी निष्ठापूर्वक अस्सल शिवचरित्राचे लेखन केले, एका निस्पृह निर्धाराने ते प्रकाशित केले आणि निष्कामपणे एक पैसाही मानधन न घेता 1250 पानांचा हा ग्रंथ केवळ 500 रुपयांत सर्व सामान्य शिव भक्तांना उपलब्ध करून दिला असे उदाहरण ऐतिहासिक साहित्यिक विश्वात विरळच.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी विजयरावांच्या मंडळाशी असलेल्या जुन्या संबंधांचा आढावा घेतला आणि अश्या थोर इतिहासकाराच्या संपर्कात येणे हे आपले सर्वांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन केले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्व शिवशंभू भक्तांनी वाटचाल करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्रद्धांजली सभेला उत्तर देतांना श्रीगुरुमंदिर पत्रभेट परिवाराच्या मुख्य संपादक आणि सद्गुरुदास महाराजांच्या कन्या सौ. प्रज्ञा फडणीस म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच 'शिवत्वाकडे वाटचाल करणारे जीवन' सद्गुरुदास महाराज जगले. त्यांनी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विषयांवर विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली आणि आपणा सर्वांना आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञानाची शिदोरी देऊन ठेवली आहे.
ह्या श्रद्धांजली सभेत शाहीर हिंगे कला अकादमीचे शाहीर हेमंतराजे मावळे, समस्त हिंदू आघाडीचे श्री मिलिंद एकबोटे, विश्वकर्मा प्रकाशनचे संपादक श्री संदीप तापकीर, आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेचे श्री मारुती आबा गोळे, इतिहास अभ्यासक श्री राज मेमाणे, सह्याद्री प्रतिष्ठान चे डॉ. महेश बुलाख, निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक, मीडिया क्युरा चे संचालक श्री संतोष देशपांडे ह्या मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका मृणाल कुलकर्णी, ह. भ. प. चिदंबरेश्वर महाराज साखरे- साधकाश्रम आळंदी, श्रीराम मंदिर अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज आणि आस्था मानसोपचार संस्थेचे डॉ मयुरेश डंके ह्यांनी पत्राद्वारे पाठवलेले शोक संदेश वाचन झाले. मंडळाच्या श्री गुरुप्रसाद कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.
शेवटी एक मिनिट मौन पाळून शांतीमंत्र पाठाने या सभेची भावपूर्ण सांगता झाली.
आग्रा ते राजगड या गरुडझेप मोहिमेत चार हिंदीभाषिक राज्यातून आमचा प्रवास होतो. तेथील पूर्वीच्या संस्थानिकांना, राजे रजवाड्यांना, सर्व सामान्यांना आम्ही शककर्ते शिवराय चे हिंदी संस्करण देतो. तो ग्रंथ वाचून ते परराज्यातील लोकही विजयरावांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची इच्छा दर्शवायचे. आता यावर्षी शक निर्माता शिवराय चे लेखक आपल्यात नाहीत हे त्या सर्वांना सांगणे खूप जड जाईल असे अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत गरुडझेप मोहिमेचे सूत्रधार व सरदार पिलाजीराव गोळ्यांचे वंशज मारुती आबा गोळे यांनी व्यक्त
Comments
Post a Comment