उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षणसंस्था उभा राहतातसिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार ; रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सर्वोत्तम व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान सोहळा
उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षणसंस्था उभा राहतात
सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार ; रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सर्वोत्तम व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : पूर्वी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यासाठी आणि त्यांना शिकविण्यासाठी म्हणून शिक्षक येत असत. या क्षेत्रात नफा आणि तोट्याचा विचार होत नसे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी देखील शिक्षक म्हणून सुरुवात केली. त्यामुळे सिंबायोसिस शिक्षण संस्थेकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. फक्त पायाभूत सुविधांनी शिक्षण संस्था चांगली होत नाही, तर उत्तम शिक्षकांमुळे चांगल्या शिक्षण संस्था उभ्या राहतात, असे मत सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउनच्या वतीने आयोजित सर्वोत्तम व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान सोहळा टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यंदाचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड विश्वकर्मा ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. बिपीन सुळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर , संचालक डॉ. हेमंत तोडकर, सचिव ॲड. शोभा सोमाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, पुण्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. आज शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. यामध्ये नफा महत्वाचा नाही. अनेक शिक्षकांना पगार जास्त आहेत. मात्र, चांगली गुणवत्ता टिकवून ठेवणे हे अवघड आहे. शिक्षण क्षेत्रात आवड म्हणून शिक्षक येत नाहीत. त्यामुळे ही स्थिती देशाला घातक आहे. प्रत्येक महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
डॉ.बिपीन सुळे म्हणाले, रोटरी क्लब ही क्रियाभिमुख असलेली संस्था आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करणारी ही विश्वसनीय संस्था असून अनेक सामाजिक उपक्रम संस्थेने राबविले आहेत. माणसाने समुद्रासारखे जगायला हवे. आपले काम नम्रपणे करावे. वय वाढल्यावर जेष्ठ व्हायला हवे, म्हातारे होऊ नये. म्हातारे होऊन आधार शोधण्यापेक्षा ज्येष्ठ होऊन आधार देणे महत्वाचे आहे.
प्रास्ताविकात डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर म्हणाले, रोटरी क्लब पूना मिडटाऊन मागील ५६ वर्षांपासून कार्यरत आहे. रोटरी क्लब ही तब्बल १२० वर्षे ही जुनी संस्था असून २०० देशात कार्यरत आहे. स्वतःपेक्षा सेवेचा ध्यास हे रोटरी चे ब्रीद आहे. त्याप्रमाणे आपला क्लब देखील कार्यरत आहे. समाज परिवर्तनाची सशक्त अशी ही चळवळ असून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शुभदा जठार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बिपिन सुळेंची ओळख माजी अध्यक्ष राजकुमार तांबे यांनी, तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॅा. धनंजय केसकर यांनी करून दिली. मानपत्राचे वाचन वृषाली देशपांडे यांनी केले.
Comments
Post a Comment