*हिरकणी रन- वुमेन्स हाफ मॅरेथॉनसुरक्षा, सक्षमीकरण व आत्मनिर्भरतेसाठी धावल्या हजारो 'हिरकणी'!*- साई जनसेवा प्रतिष्ठानतर्फे 'हिरकणी रन', वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सहभाग
पुणे: महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम व आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्व वाढावे, या उद्देशाने हजारो 'हिरकणी' रविवारी पुण्याच्या रस्त्यावर धावल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले. 'आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत', असा संदेश महिलांनी यावेळी दिला.
साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या 'हिरकणी रन', वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावांतून १२०० पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. बाबुराव सणस मैदान, सारसबागपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. तीन, पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा चार प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह 'मुक्ताई'चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता अजय पुरस्कार, तेजस बर्वे, अभिनेत्री नेहा नाईक, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सुरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर, निशा पाचंगे, स्मिता भिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते.
सोनाली कुलकर्णी म्हणाली, "राज्यभरातून धावण्यासाठी आलेल्या 'हिरकणीं'चा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मुली, महिलांनी एकमेकींना सशक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले स्वास्थ्य चांगले व तंदुरुस्त असायला हवे. त्यासाठी व्यायाम, डायट याचा समतोल राखला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक कर्तृत्ववान महिलांकडून प्रेरणा घ्यावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक सशक्त झालो, तर आपण देशासाठी, समाजासाठी चांगले योगदान देऊ शकतो."
सुरज लोखंडे म्हणाले, "हजारो महिलांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पुण्यातील महिला सुरक्षित व सक्षम असल्याचे दाखवून दिले. या मॅरेथॉनमधुन उभा राहणाऱ्या निधीचा विनियोग अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थांसाठी करण्यात येणार आहे. साई जनसेवा प्रतिष्ठान नेहमीच जनतेच्या हिताचे उपक्रम राबवत असते. 'हिरकणी रन' ही मॅरेथॉन यापुढे दरवर्षी घेतली जाणार आहे."
अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर यांची महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी झालेल्या झुंबा नृत्याने उपस्थित महिलांमध्ये उत्साह संचारला होता. सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र, मेडल, टीशर्ट व नाश्ता देण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. सणस मैदान, दांडेकर पूल, सिंहगड रोड, राजाराम पूल, संतोष हॉल ते सणस मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग होता.
Comments
Post a Comment