'बाबुजी आणि मी' कार्यक्रमातून अनुभवला स्वर-संगीताने नटलेल्या गीतांचा सुरेल सोहळा* *गायक व संगीतकार श्रीधर फडके यांच्या कार्यक्रमाचे आयोजन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सवातील चौथा दिवस*
पुणे : संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबुजी यांच्या संगीत कलेचा समृद्ध वारसा पुढे नेणाऱ्या संगीतकार श्रीधर फडके यांच्या संगीताने नटलेल्या आणि गायिकीने सजलेल्या गीतांचा आनंद पुणेकरांनी घेतला. संगीत विश्वातील फडके युग आणि फडके विद्यापीठाचा मागोवा घेण्याची संधी यानिमित्ताने रसिकांनी मिळाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी 'बाबुजी आणि मी' हा संगीतकार व गायक श्रीधर फडके व सहकाऱ्यांचा कार्यक्रम झाला.
संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले 'देव देव्हाऱ्यात नाही' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तम काव्य, संगीत आणि गायक याचा अनोखा मिलाफ म्हणजे ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके उर्फ बाबुजी यांची गीते आहेत, याचा प्रत्यय यावेळी उपस्थितांना आला. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, सखी मंद झाल्या तारका, फिटे अंधाराचे जाळे, ज्योती कलश छलके, विकत घेतला श्याम, मी राधिका अशी एका पाठोपाठ एक उत्तमोत्तम गीते सादर झाली.
संत एकनाथांची रचना असलेले सावळा गे माये रूपे सुंदर... या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सांज ये गोकुळी सावळी सावळी, एक धागा सुखाचा, ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था ही भाव भक्तीगीते सादर होताच त्याला टाळ्यांच्या गजरात रसिकांनी साथ दिली.
गायक श्रीधर फडके यांना शिल्पा पुणतांबेकर (गायन), किमया काणे (सिंथेसायझर), प्रणव हरिदास (बासरी), तुषार आग्रे (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्य) यांनी साथसांगत दिली. सुकन्या जोशी यांनी सांगीतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment