आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पद्धतीने प्रचार-प्रसार व्हावा : डॉ. शरच्चंद्र हर्डीकरएकदंत प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा ‘एकदंत कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरव
आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पद्धतीने प्रचार-प्रसार व्हावा : डॉ. शरच्चंद्र हर्डीकर
एकदंत प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा ‘एकदंत कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरव
पुणे : आयुर्वेद ही पुरातन उपचार पद्धती असून आयुर्वेदाविषयी जगाला प्रचंड आकर्षण आहे. आयुर्वेदाचा देश-विदेशात शास्त्रोक्त पद्धतीने प्रचार व्हायला हवा, अशी अपेक्षा ख्यातनाम अस्थिव्यंगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. शरच्चंद्र हर्डीकर यांनी व्यक्त केली.
शतकपूर्ती केलेल्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा एकदंत प्रतिष्ठानतर्फे ‘एकदंत कृतज्ञता पुरस्कार’ देऊन आज (दि. 3) गौरव करण्यात आला. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील निमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. शरच्चंद्र हर्डीकर यांच्या हस्ते संस्थेस सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र भागवत यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. एकदंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मुकुंद कोठावदे, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, डॉ. भीम गायकवाड मंचावर होते.
डॉ. कोठावदे यांच्या कर्करोग जागृतीवरील भित्तीचित्रे व कलाकृतींचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या आवारात भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. शरच्चंद्र हर्डीकर पुढे म्हणाले, देशात अनंत काळापासून अस्तित्वात असलेल्या आयुर्वेद उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उपचार पद्धतीचे कुठलेही शास्त्र शिका पण इतर शास्त्राचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. उपचार पद्धतीत काही मर्यादा वाटत असल्या तरी संशोधनाद्वारे त्यात कशाचा समावेश करू शकतो याचाही विचार होणे अपेक्षित आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आरोग्याच्या क्षेत्रात संवेदनशीलता, नैतिकता आणि मानवता या गोष्टींना खूप महत्त्व आहे. आरोग्याच्या बाबतीत मानवी संवेदना हद्दपार करता येणार नाहीत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात होणारा संवाद हा आंतरिक असतो. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य होत असताना सध्याची आरोग्य क्षेत्रातील उपचार पद्धती चिंतनाचा विषय ठरावा अशी आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. भालचंद्र भागवत म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण मंडळामुळे आयुर्वेदाचा प्रचार देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कामाची दिशा चांगली असेल तर संस्थेच्या कार्याचे नक्कीच कौतुक होते. एकदंत प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांना सर्वेतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात डॉ. मुकुंद कोठावदे यांनी पुरस्कार सोहळ्याविषयी माहिती सांगितली तर संस्थेविषयी डॉ. भाऊसाहेब जाधव यांनी अवगत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा संगोराम यांनी केले तर आभार स्मिता कोठावदे यांनी मानले.
Comments
Post a Comment