मिर्ची RTO (Rule Todna Over) - टू-व्हीलर रॅलीसाठी पुणे सज्ज!
*पुणे, ३१ जानेवारी ( विशेष प्रतिनिधी) :* संपूर्ण देशात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा हेल्मेट न घालणे, वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, वेगाने वाहन चालवणे यामुळे दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. वाहतुकीचे नियमांचे पालन कशा प्रकारे करावे, वाहतुकीचे नियम नेमके काय आहेत या विषयी समाजात जागृती निर्माण व्हावी, म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पुणे शहरामध्ये वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणार्यांची संख्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे शहरात अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यासाठीच रेडियो विश्वातील अग्रगण्य असणारं नाव ९८.३ मिरची रस्ता सुरक्षा माह साजरा करत आहे.
या अंतर्गत पुण्यातील सगळ्यात प्रथम सुरु झालेलं प्रायव्हेट एफ एम ९८.३ मिरची तर्फे “मिरची RTO म्हणजेच रूल्स तोडणं ओव्हर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मिरची तर्फे वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे, वाहतुकीचे नियम पाळणे कसे आवश्यक आहे, नियम मोडल्यास कशा प्रकारचा दंड होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
या उपक्रमाचा पुढील भाग म्हणून मिर्ची तर्फे RTO टू-व्हीलर रॅली आयोजित करण्यात आली आहे. या खास उपक्रमासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व चौकातून या भव्य रॅलीला प्रारंभ होणार आहे. सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुणेकरांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयी रुजवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांची जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ही रॅली पुणेकरांना एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. या रॅलीची सुरुवात बालगंधर्व चौकातून होईल आणि गुड लक चौक, FC रोड, कृषि महाविद्यालय, न.ता.वाडी, शिमला ऑफिस, जंगली महाराज रोड या शहराच्या प्रमुख मार्गांवरून प्रवास करत बालगंधर्व चौकात तिचा समारोप होईल. पुणे शहरातील तरुण, विद्यार्थी, महिला या सर्वांसाठी ही रॅली खुली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी हेल्मेट बंधनकारक असेल, जेणे करून सर्वजण वाहन सुरक्षिततेचे पालन करतील.
या रॅलीचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पाटील, अभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेता सौरभ गोखले मिरचीचे बिझनेस डिरेक्टर प्रभजोत सिंह खेरा, यांच्या हस्ते होणार असून, पुणे रेडिओ मिर्चीचे आरजे – Mirchi Adhishh, Mirchi Utsavi, Mirchi Nidhi, Mirchi Nimi, Mirchi Snehal, Mirchi Milind आणि क्लस्टर हेड स्मिता रणदिवे देखील रॅलीमध्ये सहभागी होऊन पुणेकरांना प्रोत्साहन देणार आहेत. या वेळी स्ट्रीट सेन्स चे संचालक श्री. अनिल वळीव व मिशन सेफर रोडचे संचालक कल्याण रमण उपस्थित असतील.
मिर्ची RTO टू-व्हीलर रॅली पुणेकरांसाठी एक प्रेरणादायी आणि जागरूकता निर्माण करणारा उपक्रम ठरणार आहे. सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन, पुणेकरांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ९८.३ मिरची तर्फे करण्यात येत आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी रेडिओ मिर्चीच्या ८४ १२ ९८३ ९८३ या What’s App क्रमांकावर नाव नोंदवावे. नोंदणीसाठी वैध वाहन परवाना आणि हेल्मेट अनिवार्य आहे. ९८.३ मिरची पुण्यात नेहमीच विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात नेहमीच अग्रेसर असते. सामाजिक, मनोरंजन अशा सर्व प्रकारे मिरची पुणेकरांशी नेहमीच जोडले गेले आहे. हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता, त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकावा, असा ९८.३ मिर्चीचा मानस आहे.
Comments
Post a Comment